
सावंतवाडी : ओटवणे येथील चौगुले मित्रमंडळ यांच्यावतीने दीपावली निमित्त ओटवणे केंद्र शाळा नं. १ नजिक झालेल्या या नरकासुर स्पर्धेत ओटवणे चौगुलेवाडीने प्रथम क्रमांक, गावठणवाडीच्या आकाश मेस्त्री मित्रमंडळाने द्वितीय क्रमांक तर तारीवाडीच्या फायर स्कॉडमित्र मंडळाने तृतीय क्रमांक पटकाविला. तर या स्पर्धेत माजगाव कासारवाडा, ओटवणे चव्हाटा बाल मंडळ आणि ओटवणे आंबेडनगर उत्तेजनार्थ ठरले.
या नरकासुर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ओटवणे सारख्या ग्रामीण भागात झालेल्या या स्पर्धेत एका पेक्षा एक असे सरस, हालते व दृक श्राव्य नरकासुर स्पर्धकांनी सादर करीत रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. या नरकासुर स्पर्धेला ओटवणे दशक्रोशीतील रसिकांनी गर्दी केली होती. चुरशीच्या या नरकासुर स्पर्धेत चार परीक्षकांनी निकाल दिल्यानंतर पहिल्या तीन क्रमांकात प्रत्येकी एका गुणांचा फरक होता. तसेच या स्पर्धेत ओटवणे रिद्धी सिद्धी ग्रुप, माजगाव दळवीवाडा मालवणी एक्सप्रेस, ओटवणे रमाईनगर यांचेही नरकासुर लक्षवेधी ठरले. या स्पर्धेतील पहिल्या तिन्ही देखाव्याने रसिकांना अक्षरशः मोहिनी घातली. तसेच इतरही जम्बो नरकासुर या स्पर्धेत यादगार ठरले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण गावठणवाडी कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर, सामाजिक युवा कार्यकर्ते बबलू गावकर, पोलिस कॉन्स्टेबल मनोज राऊत, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, बाळा गावकर, एकनाथ गावकर, आनंद भैरवकर, रामा म्हैसकर, सिद्धेश ओटवणेकर, संतोष भैरवकर, मंगेश गावकर, नवीन भराडी, पत्रकार महेश चव्हाण आदी उपस्थित होते. या स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १०००२ रुपये, ७००२ रुपये, ३००२ रुपये तर उत्तेजनार्थ तिन्ही विजेत्यांना प्रत्येकी १००२ रुपयाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील पारितोषिके बबलू गावकर, उमेश गावकर, महेश गावकर यांनी पुरस्कृत केली होती.
या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जिल्हा मूर्तिकार संघाचे अध्यक्ष नारायण सावंत, मूर्तिकार अनंत मेस्त्री, मास्टर ऑफ क्राफ्टमन ओंकार मांजरेकर, युवा आर्टिस्ट रोहित वरेकर यानी काम पाहिले. या स्पर्धेचे नियोजन उदीत गावकर, प्रथमेश गावकर, तुषार गावकर, प्रमोद गावकर, सुनील गावकर, गजानन गावकर, प्रणव गावकर, विशाल गावकर, वेदांत गावकर, श्रेयस गावकर, ऋषिकेश गावकर, ओम गावकर, देविदास गावकर, देवेश भैरवकर, आनंद गावकर यानी केले.