
सावंतवाडी : परंपरेचा वारसा जपत माठेवाडा मित्रमंडळाने यंदाही आपली ४० वर्षांची अनोखी “प्रत्येक दारी फराळ” ही प्रथा कायम ठेवली आहे. दीपावली सणानिमित्त माठेवाडा परिसरात राहणारे सर्वजण दरवर्षीप्रमाणे एकत्र येऊन एकमेकांच्या घरी जाऊन फराळाचा आस्वाद घेतात. या परंपरेमुळे परिसरातील आपुलकी, ऐक्य आणि सणाचा आनंद अधिक वाढतो.
सुमारे चार दशकांपूर्वी काही उत्साही तरुणांनी सुरू केलेली ही परंपरा आज एक वैशिष्ट्य बनली आहे. दीपावलीच्या दिवशी सर्व मंडळी एकत्र जमून माठेवाड्यातील प्रत्येक घरात जाऊन फराळाचा आनंद घेत. आजही तीच परंपरा तितक्याच उत्साहाने आणि प्रेमाने साजरी केली जाते. यंदाच्या दीपावलीतही माठेवाडा मित्र मंडळातील सर्व सदस्य मोठ्या उत्साहात सहभागी झाले. पारंपरिक पोशाख परिधान करून, फटाक्यांच्या रोषणाईत मंडळातील सदस्यांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन फराळ घेतला. एकमेकांना शुभेच्छा देत सणाचा उत्साह द्विगुणीत झाला. याप्रसंगी माठेवाडा मित्र मंडळाचे बाळ गोपाळ आणि इतर वरिष्ठ सदस्य उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, “ही परंपरा फक्त फराळापुरती मर्यादित नाही. ती आमच्या ऐक्याची, प्रेमाची आणि परस्पर स्नेहाची निशाणी आहे. पुढच्या पिढ्यांनाही ही परंपरा कायम ठेवावी, हीच आमची इच्छा आहे.” दीपावलीच्या या पारंपरिक साजरीमुळे माठेवाडा परिसर आजही ऐक्य, बंधुत्व आणि सामाजिक सलोखा याचे उत्तम उदाहरण ठरत आहे. ४० वर्षांची ही उज्ज्वल परंपरा कायम राखणाऱ्या माठेवाडा मित्र मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.