
सावंतवाडी : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कारकिर्दीची गाथा नेहमीच प्रेरणादायी असते. अशाच अविरत सेवेचं आणि जिद्दीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते अनंत माधव. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदीनी वृत्तपत्र विक्रेता दिवस साजरा करत या विक्रेत्यांचे ऋण व्यक्त केले जातात. गेली ७० वर्ष सावंतवाडीकरांची सकाळ ताज्या खबर देऊन करणारे अनंत माधव आजही वयाच्या 85 व्या वर्षी आपलं व्रत जोपासत आहेत.
माजगावचे रहिवासी असलेले अनंत माधव वयाच्या ८५ व्या वर्षीही सावंतवाडीत येऊन वृत्तपत्र विक्रीचा आपला व्यवसाय मोठ्या उत्साहाने आणि निष्ठेने करत आहेत. तब्बल ७० वर्षांहून अधिक काळ त्यांनी या क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. जे खरोखरच कौतुकास्पद आहे. श्री. माधव यांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी वृत्तपत्र विक्रेता म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी कै. विनायक वाडकर यांच्याकडे विक्रेता म्हणून काम केले. त्यांच्या संघर्षाची सुरुवात पायी चालत वृत्तपत्र वितरणाने झाली. त्यानंतर त्यांनी सायकलचा आधार घेतला. तब्बल ७० वर्षे त्यांनी सायकलवरून वृत्तपत्रांचे वितरण केले. मेहनत आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर १९७२ मध्ये त्यांनी सावंतवाडी बाजारपेठेत स्वतःचा व्यवसाय सुरू केला. केवळ सावंतवाडीपुरतेच न राहता, त्यांनी वृत्तपत्र वितरणाची 'पेपर लाईन' माजगावसह लगतच्या गावात घेऊन जात आपली सेवा विस्तारली. आजही त्यांची ही अविरत सेवा सुरू आहे. त्यांच्याकडे सध्या २ वितरक कामाला आहेत. मोठ्या प्रमाणात वृत्तपत्र विक्री त्यांच्या दुकानातून दररोज होते.
अनंत माधव आपल्या या यशाचे श्रेय आवर्जून कुटुंबियांच्या मोठ्या पाठिंब्याला देतात. कुटुंबाच्या आधाराशिवाय हे शक्य झाले नसते, असं ते सांगतात. वयाच्या ८५ व्या वर्षीही त्यांची कार्यक्षमता पाहून अनेकांना आश्चर्य वाटते. रोज पहाटे उठून पेपर विक्री करणे, जे आरोग्यासाठी अत्यंत चांगले असल्याचे ते मानतात. आजही ते रिक्षातून शहरात येत, पायी चालत दुकानापर्यंत येतात. श्री. माधव यांच्या दुकानात वृत्तपत्रांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. यात तरूण भारत, सकाळ, रत्नागिरी टाइम्स, कोकणसाद, पुढारी, प्रहार, लोकमत, नवाकाळ, संध्याकाळ, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस यांसारख्या प्रमुख वृत्तपत्रांसह साप्ताहिक, मासिक अंक आणि आवर्जून मागणी असणारे दिवाळी अंक देखील उपलब्ध असतात. त्यांच्याकडे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांतील वृत्तपत्रे मिळतात. अनंत माधव यांचा वारसा त्यांचे सुपुत्र प्रसाद माधव हे समर्थपणे पुढे नेत आहेत. प्रसाद माधव देखील गेली ४० वर्षे या व्यवसायात कार्यरत आहेत. वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय ते मोठ्या ताकदीने आणि नव्या उत्साहाने सांभाळत आहेत. तेही आपल्या या प्रवासात कुटुंबियांची मोठी साथ लाभत असल्याचे ते सांगतात. वयाच्या 85 तही सेवा देणाऱ्या अनंत माधव यांचा प्रवास म्हणजे, मेहनत, निष्ठा आणि जिद्द या मूल्यांची महती सांगणारी आहे. त्यांचा उत्साह आजच्या तरुण पिढीला लाजविणारा आहे. त्यांना वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.