फिल्मी स्टाईलने पाठलाग

बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई
Edited by: विनायक गांवस
Published on: October 14, 2025 10:49 AM
views 36  views

सावंतवाडी : गोवा राज्यातून अवैध मार्गाने महाराष्ट्रात आणली जाणारी गोवा बनावटीची लाखो रुपयांची दारू घेऊन जाणारी एक इनोव्हा कार आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून ६ लाख ,०२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

१३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री साडेनऊ वाजता आंबोली पोलीस चेकपोस्टवर नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी सुरू असताना, सावंतवाडीकडून कोल्हापूरच्या दिशेने येणारी एमएच ०२ बीडी २९१७ क्रमांकाची इनोव्हा गाडी पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने न थांबता ती वेगाने पळवून नेली. गाडी पळून गेल्याचे लक्षात येताच, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी सरकारी वाहनाने तिचा तत्काळ पाठलाग सुरू केला. हा थरार चौकुळ रस्त्यावर सुरू झाला. पोलिसांनी चौकुळ येथील स्थानिक लोकांना त्वरित रस्ता अडवण्यास सांगितले. स्थानिकांच्या मदतीने अखेरीस ही इनोव्हा गाडी थांबवण्यात पोलिसांना यश आले.

गाडीची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा बनावटीची विविध ब्रँडची २० बॉक्स दारू आढळून आली, ज्याची किंमत ₹१,०२,०००/- इतकी आहे. या कारवाईत पोलिसांनी दारूसह, अवैध वाहतुकीसाठी वापरलेली पाच लाख रुपये किमतीची इनोव्हा गाडी असा एकूण ₹६,०२,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी इनोव्हा कारमधील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सतीश भीमराव आर्दळकर (वय ३७, रा. अडकूर, चंदगड, कोल्हापूर,  अविनाश दशरथ पाटील (वय ३२, रा. बोंदुर्डी, चंदगड, कोल्हापूर) यांना ताब्यात घेतले असून पोलिसांनी पंचनामा करून आरोपींवर गुन्हा नोंदवला असून, अटकेची कारवाई सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती नयोमी साटम, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी यशस्वी केली. या पथकात हवालदार संतोष गलोले, रामदास जाधव, लक्ष्मण काळे, मनीष शिंदे आणि गौरव परत यांचा समावेश होता.