
सावंतवाडी : जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यातील शेती आणि नागरिकांचे झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नुकसानीचा एकत्रित विचार करून राज्यातील अनेक तालुके 'आपत्तीग्रस्त' घोषित करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार, सावंतवाडी तालुक्याचाही समावेश आपत्तीग्रस्त तालुक्यांच्या यादीत करण्यात आला आहे.
आपत्तीग्रस्त घोषित झालेल्या तालुक्यातील सर्व बाधित, आपदग्रस्त नागरिकांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सर्व सवलती तातडीने देण्यास या शासन निर्णयाने मान्यता दिली आहे. शासनाच्या माहितीनुसार, राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या काळात २६.६९ लाख हेक्टर तर सप्टेंबर २०२५ या एका महिन्यात सुमारे ३९ लाख हेक्टर असे एकूण सुमारे ६५ लाख हेक्टर क्षेत्राचे शेतीपिक नुकसान झालेले आहे. या नैसर्गिक आपत्तीत मनुष्यहानी, जनावरे दगावणे आणि घरांची पडझड होणे अशा घटनाही घडल्या आहेत. शासनाच्या या निर्णयानुसार, आपत्तीग्रस्त घोषित झालेल्या तालुक्यातील बाधित नागरिकांसाठी पुढील सवलती तातडीने लागू करण्यात आल्या आहेत. जमीन महसूलात सूट मिळेल, सहकारी कर्जाचे पुनर्गठन केले जाईल. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे. तिमाही वीज बिलात माफी मिळणार आहे. परीक्षा शुल्कात माफी तसेच १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांची फी माफी लागू असेल, या सवलतींबाबत संबंधित प्रशासकीय विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सह सचिव, महाराष्ट्र शासन संपत सुर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे सावंतवाडीसह राज्यातील इतर बाधित तालुक्यांतील शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.











