
वैभववाडी : वाभवे कोंडवाडी येथील समाधान दिगंबर रावराणे (वय ४६) यांचे तणनाशक प्राशन केल्यानंतर उपचारादरम्यान आज (ता. ७) पहाटे निधन झाले. गुरुवारी दारूच्या नशेत त्यांनी लाकडे ठेवण्याच्या जागी ठेवलेल्या बाटलीतील तणनाशक प्राशन केले होते. त्यानंतर त्यांच्यावर कणकवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
समाधान रावराणे यांनी ४ डिसेंबर रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास दारुच्या नशेत तणनाशक पिले. घरच्यांना ही माहिती मिळताच त्यांनी तत्काळ त्यांना कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. गेल्या तीन दिवसांपासून डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते; मात्र प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेची खबर त्यांचे भाऊ संदीप दिगंबर रावराणे यांनी वैभववाडी पोलिसात दिली आहे. आज दुपारी समाधान रावराणे यांच्यावर वाभवे कोंडवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ व भावजय असा परिवार आहे.दरम्यान, तणनाशक प्राशनामुळे मृत्यू झाल्याची ही गेल्या पंधरा दिवसांतील तिसरी घटना घडली आहे.











