
देवगड : मंदीरातील बैठकीतच ट्रस्ट अध्यक्षांकडून ग्रामस्थाला मारहाण झाल्याची घटना देवगड तालुक्यातील मोंड येथे घडली आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
देवगड तालुक्यातील मोंड भैराई मंदीर येथे शनिवारी सायंकाळी मंदीर ट्रस्टी ग्रामस्थ आणि मानकरी यांच्या आयोजित केलेल्या बैठकीत ग्रामस्थ गणेश राणे यांनी बैठकीतच अध्यक्ष व ट्रस्टी यांना त्यांचाअधिकाराबाबत विचारले, याचा राग येवून मंदिर ट्रस्टी यांनी गणेश राणे यांना जबरी मारहाण करून जखमी केले व मंदीराबाहेर ओढत नेले.ही घटना मोंड भैराई देवी मंदीर येथे शनिवार दि.6 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5.30 वा.सुमारास घडली.याबाबत गणेश राणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून देवगड पोलिसांनी मोंड भैराई मंदीर ट्रस्ट अध्यक्ष शैलेंद्र राणे यांच्यासह त्यांचे सहकारी तीन विश्वस्त अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मोंड भैराई देवी मंदीर येथे दि. 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता भैराई मंदीर ट्रस्ट विश्वस्त, मानकरी व ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक सुरू होती.या बैठकीत ग्रामस्थ गणेश राणे यांनी मंदीर ट्रस्टी त्यांचा अधिकाराबाबत विचारणा केली याच राग येवून मंदिर ट्रस्टी आणि ग्रामस्थ गणेश राणे यांच्यामध्ये वाद झाले.या वादावेळी ट्रस्टी अध्यक्ष शैलेंद्र मधुसूदन राणे(55), विश्वस्त शशांक मधुसूदन राणे(52), अनिल प्रभाकर राणे(56) व उपेंद्र सुधाकर राणे(48) रा.सर्व मोंड राणेवाडी यांनी संगनमत करून गणेश राणे यांना शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी दिली.यातील अध्यक्ष शैलेंद्र राणे यांनी हाताच्या ठोशाने गणेश राणे यांच्या तोंडावर, नाकावर जोरात मारहाण करून जखमी केले.उपेंद्र राणे यांनी गणेश यांचा डावा हात अंगठ्याजवळ पिरगळून टाकला तर शशांक राणे व अनिल राणे यांनी गणेश राणे यांना मंदीरातून ओढत बाहेर नेवून खाली पाडले.याबाबत गणेश राणे यांनी देवगड पोलिस स्थानकात तक्रार दिली.या तक्रारीवरून पोलिसांनी अध्यक्ष शैलेंद्र मधुसूदन राणे यांच्यासह विश्वस्त शशांक मधुसूदन राणे, अनिल प्रभाकर राणे व उपेंद्र सुधाकर राणे या चौघांविरूध्द भारतीय न्याय संहिता 117(2), 115(2), 352, 351(2),(3), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस हवालदार आशिष कदम यांच्या कडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.














