
सावंतवाडी : उद्योग ४.० च्या बदलत्या युगात तांत्रिक कौशल्ये आत्मसात केलेल्या मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन, महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला अनुरूप कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तांत्रिक विद्यालयांमध्ये रोजगारक्षम अल्पमुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
याच पार्श्वभूमीवर, जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी येथे दिनांक ८ ऑक्टोबर रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण शॉर्ट टर्म कोर्सेसचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
दुपारी ३ वाजता झालेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले होते. या माध्यमातून, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना तसेच सामान्य इच्छुक उमेदवारांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्राशी सुसंगत प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होईल. सावंतवाडी येथील या उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून सावंतवाडीतील फर्नांडिस वुडन आर्ट चे प्रोप्रायटर अँड्र्यू मनवेल फर्नांडिस तसेच माजी आमदार राजन तेली आणि सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष संजू परब हे उपस्थित होते. संस्थेच्या वतीने सावंतवाडी आयटीआयचे उपप्राचार्य निलेश ठाकूर, गटनिदेशिका श्रीमती सुचिता नाईक , तसेच आयएमसी सदस्य श्री संतोष तेली आणि सातपुते सर उपस्थित होते. संस्थेतील सर्व कर्मचारी वृंद यांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या कार्यक्रमामार्फत अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींबरोबरच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना खास निमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये औद्योगिक आस्थापना, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, 'लाडकी बहीण योजना', 'पीएम विश्वकर्मा योजना', 'आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र', आणि 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्रम' यांसारख्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा समावेश होता.
त्याचप्रमाणे, शासकीय आणि अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असलेले आणि प्रशिक्षण पूर्ण केलेले आजी-माजी प्रशिक्षणार्थी तसेच त्यांचे पालक यांनी देखील या महत्त्वपूर्ण ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास उत्स्फूर्तपणे उपस्थिती दर्शवून या नव्या उपक्रमाचे स्वागत केले.
नवीन युगातील गरजांनुसार कौशल्ये विकसित करण्याच्या दिशेने हे शॉर्ट टर्म कोर्सेस एक महत्त्वाचे पाऊल असून, सावंतवाडीसह संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांसाठी हे अभ्यासक्रम रोजगार निर्मितीसाठी मैलाचा दगड ठरतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.










