
सावंतवाडी : ‘युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी’ने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत अनेक गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध करून दिले. संघटनेच्या सदस्यांनी गोव्यातील रुग्णालयांमध्ये आणि सावंतवाडी येथे रुग्णांना आवश्यक रक्तगट उपलब्ध करून देत त्यांचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे.
गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल असलेल्या सावंतवाडी येथील प्रदीप पोकळे यांना शस्त्रक्रियेसाठी B+ पॉझिटिव्ह रक्ताची तातडीने गरज होती. अशा वेळी सावंतवाडी येथून गणेश हरमलकर आणि संघटनेचे खजिनदार अनिकेत पाटणकर यांनी गोवा बांबोळी रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. तर गोवा मणिपाल रुग्णालयात दाखल असलेल्या माजगाव येथील सूर्यकांत सावंत यांनाही शस्त्रक्रियेसाठी B+ पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता होती. या परिस्थितीत आंबोली येथून परेश कर्पे आणि सावंतवाडी येथून वैभव दळवी यांनी मणिपाल रुग्णालयाच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान करून मदत केली. तसेच गोवा बांबोळी रुग्णालयात दाखल असलेल्या एका सावंतवाडीतील युवकाला शस्त्रक्रियेसाठी O- निगेटिव्ह या दुर्मिळ रक्तगटाची गरज होती. ही बाब कळताच माणगाव येथून सूर्यकांत आडेलकर यांनी बसने प्रवास करून गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अॅडमिट असलेल्या कृष्णाजी वर्दम यांना O+ रक्तगटाच्या PCV ची तातडीने आवश्यकता होती. यासाठी रोहित राऊळ यांनी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल 'युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी'ने त्यांचे आभार मानलेत. संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी या कार्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने केलेल्या या प्रयत्नांमुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे.