
सावंतवाडी : देशाच्या अभियांत्रिकी क्षेत्राचे शिल्पकार भारतरत्न डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा अभियंता दिन यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या नात्याने सार्वजनिक बांधकामचे माजी कार्यकारी अभियंता प्रदीप जोशी उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व डॉ.विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, मुख्य कार्यकारी अधिकारी ले.कर्नल (नि.)रत्नेश सिन्हा, प्राचार्य डॉ.रमण बाणे व उपप्राचार्य गजानन भोसले आदी उपस्थित होते. याप्रसंगी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रदीप जोशी यांनी ‘थ्री इडीयट्स’ चित्रपटातील संवादांचा दाखला देत, “ज्ञान व कौशल्यात सर्वोत्कृष्टता साधा, यश तुमच्या मागे आपोआप चालत येईल”असे सांगितले. अभियांत्रिकी क्षेत्रात स्टार्टअप सुरू करून यश मिळवलेल्या संकेत कशाळीकर, शमीम देशमुख, गार्गी सांडू व राजेश सप्रे या तरुण अभियंत्यांचा प्रेरणादायी प्रवासही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला. रत्नेश सिन्हा यांनी विद्यार्थ्यांना जबाबदार अभियंता बनून देशाच्या प्रगतीत योगदान देण्याचे आवाहन केले. डॉ.रमण बाणे यांनी अभियांत्रिकी क्षेत्राचे मानवी जीवनातील अविभाज्य स्थान अधोरेखित केले. त्रिशा पवार, वैदेही वालावलकर व पूजा लांबर या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आयोजित पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेला मान्यवरांनी भेट दिली. कॉम्प्युटर विभागातर्फे क्वीझ व लोगो डिझाईन तर मेकॅनिकल विभागातर्फे क्वीझ व आयडिया पिचिंग स्पर्धा घेण्यात आली असून निकाल संध्याकाळी उशिरा जाहीर करण्यात येतील. कार्यक्रमाचे निवेदन शॅल्मोन आल्हाट, अथर्वा परब, राहुल आरोलकर व सुयोग जोशी या विद्यार्थ्यांनी केले. आभार प्रदर्शन नेहल पुजारे हिने केले.