
सावंतवाडी : पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'नादब्रह्म सावंतवाडी' तर्फे रविवारी १४ सप्टेंबर रोजी 'स्वरगोविंद' हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संध्याकाळी ४.३० वा. गोविंद चित्रमंदिर येथे होणार आहे.
कार्यक्रमाचे पहिले सत्र सायंकाळी ५ वा. सुरू होईल. या सत्रात हर्मोनियम जुगलबंदी सादर करण्यात येणार असून बेलगाव येथील पं. सुधांशु कुलकर्णी व सारंग कुलकर्णी हे कलाकार सादरीकरण करणार आहेत. त्यांना तबल्यावर गोव्याचे उत्पल सायनेकर साथ देणार आहेत. या सत्राचे निवेदन संजय कात्रे करतील. दुसरे सत्र सायंकाळी ७ वा. होणार असून या सत्रात नाट्यगीत व अभंग गायन रसिकांसमोर सादर केले जाईल. अभिषेक काळे (सांगली) व सौ. केतकी चैतन्य (मुंबई) हे कलाकार आपले गाणे सादर करणार आहेत. या सत्राला ऑर्गनवर प्रसाद शेवडे, तबल्यावर अभिनव जोशी, पखवाजावर विक्रम नर तर मंजिरा व टाळांवर तेजस प्रभुदेसाई यांची साथ लाभणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवानंद भिडे, उपाध्यक्ष प्रदीप शेवडे, खजिनदार किशोर सावंत, सचिव प्रसाद शेवडे व नादब्रह्म परिवार यांनी मिळून या सोहळ्याचे आयोजन केले आहे. संगीतप्रेमींनी या संगीतमय मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष शिवानंद भिडे यांनी केले आहे.