
सावंतवाडी : सिंधुदुर्ग हा वैशिष्टपूर्ण भौगोलिक परिस्थिती, दुर्ग, मनमोहक समुद्रकिनारा व नैसर्गिक संपत्तीचे वरदान असलेला जिल्हा असून देश विदेशातील पर्यटक भेट देत असतात. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी व स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाकडून 'सिंधुरत्न समृद्ध योजना' ही पथदर्शी योजना राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेमार्फत या योजनेअंतर्गत (सार्वनिक / खासगी भागीदारीतून) आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस उभारण्यात येणार असून यासाठी 'सिंधुरत्न समृद्ध योजना' अंतर्गत तब्बल १५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती दीपक केसरकर यांच्याकडून देण्यात आली आहे.
त्यासाठी Type A (30.00 लक्ष) व Type H (40.00 लक्ष) असे दोन प्रकारचे आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस उभारणेत येणार असून लाभार्थ्यास सदर प्रकल्पाच्या 50 टक्के अनुदान आदा केले जाणार आहे. सदर योजनेंतर्गत आतापर्यंत इच्छूक पात्र 45 लाभार्थी यांची निवड करणेत आली असून केवळ दोन महिन्यांच्या आत कॉटेजेस पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. योजनेमध्ये लाभार्थ्याची गुंतवणूक रक्कम जास्त असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येणार असून योजनेतील लाभार्थ्यांची कर्ज रकम संबंधित कंपनीकडे वर्ग करण्याचा विशेष कार्यक्रम उद्या सोमवार दिनांक 18.08.2025 रोजी सकाळी 11.00 वाजता सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्रधान कार्यालय ओरोस येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास दीपक केसरकर, अध्यक्ष सिंधुरत्न समृद्ध योजना, मनिष दळवी, अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अनिल पाटील (भा.प्र.से), जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, रविंद्र खेबुडकर (भा.प्र.से), मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जयप्रकाश परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रापं) जिल्हा परिषद सिंधुदुर्ग उपस्थित राहणार आहेत. या उपक्रमामुळे सिंधुदुर्गातील पर्यटनाला नवे बळ मिळणार असून, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. परिणामी, सिंधुदुर्ग पर्यटन नकाशावर नवी उंची गाठेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.