दहीहंडी उत्सवातून हिंदूंच्या एकतेची ताकद दाखवून द्या : नितेश राणे

Edited by: विनायक गांवस
Published on: August 17, 2025 13:19 PM
views 92  views

सावंतवाडी : संदीप गावडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सावंतवाडीत होत असलेली ही भव्य दिव्य दहीहंडी पाहण्याचा आज प्रथमच योग आला. दहीहंडी सारखा उत्सव हा हिंदू धर्माच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा सण आहे. या दहीहंडीच्या निमित्ताने सर्व हिंदू बांधव एकत्र येतात. कोणतीही जात, भाषा यांचा विचार न करता केवळ हिंदू म्हणून एकत्र येऊन आपल्या या हिंदू राष्ट्रांमध्ये सर्वात मोठी ताकद ही केवळ हिंदूंचीच आहे हे दाखवून देण्याची संधी या सणांच्या माध्यमातून प्राप्त होते. त्यामुळे ही एकी अशाच प्रकारे नेहमीच दाखवून द्या, असे आवाहन राज्याचे मत्स्य व्यवसाय बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. 

 रात्री बारा वाजेपर्यंत केवळ मुंबई व ठाण्यातच दहीहंडी उत्सवासाठी दहीहंडी प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात हे पाहिले होते. मात्र, सावंतवाडी शहरात देखील रात्री उशिरापर्यंत एवढ्या मोठ्या संख्येने दहीहंडी प्रेमी उपस्थित असल्याचे पाहून आनंद वाटला. यानिमित्ताने आज आमच्या सावंतवाडीकरांनी अतिशय थक्क करून टाकलं अशा शब्दात श्री. राणेंनी सावंतवाडीकरांचे देखील कौतुक केले. भाजपाचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून येथील आरपीडी हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित भव्य दहीहंडी उत्सवाला रात्री उशिरा पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांनी संदीप गावडे यांचे कौतुक व अभिनंदन केले. याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, युवा नेते संदीप गावडे, भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर , दिलीप भालेकर, जितेंद्र गावकर , अनिकेत आसोलकर, सागर ढोकरे, चैतन्य सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी शहरातील तब्बल २१ दहीहंड्या फोडल्यानंतर संदीप गावडे आयोजित दहीहंडी उत्सवात पाच थरांची सलामी देणाऱ्या अमेय तेंडोलकर मित्रमंडळ गोविंदा पथकाला सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने गोविंदा तसेच दहीहंडी प्रेमी उपस्थित होते.