
सावंतवाडी : राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान 'सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान'चे रवी जाधव यांना देण्यात आला. मंडळाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
६५ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या राजा शिवाजी चौक मित्र मंडळाने आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. हे मंडळ गरजूंना नेहमी मदत करते आणि कोणताही भेदभाव न करता कार्यकर्त्यांना आधार देते. या मंडळाकडून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने सामाजिक कार्यात योगदान द्यावे, अशी भावना येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला येथे मोलाचे स्थान दिले जाते आणि प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन काटेकोरपणे केले जाते. यावर्षी मंडळाच्या बैठकीत सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीला ध्वजारोहणाचा मान देण्याचा निर्णय घेण्यात आला. मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, अध्यक्ष बंटी माठेकर, सचिव दीपक सावंत आणि इतर पदाधिकाऱ्यांनी रवी जाधव यांचे सामाजिक कार्य पाहून त्यांना हा बहुमान देण्याचा एकमताने निर्णय घेतला.
हा मान मिळाल्यानंतर रवी जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "ध्वजारोहणाचा हा बहुमान माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. ध्वजारोहणाचा मान मिळवणे ही काही सामान्य गोष्ट नाही; त्यासाठी आपले कर्तृत्व सिद्ध करावे लागते. राजा शिवाजी चौक मित्र मंडळाने माझ्या कार्याची दखल घेतली आणि माझ्या आयुष्यात एक अविस्मरणीय आठवण दिली."
या सन्मानाबद्दल रवी जाधव यांनी मंडळाचे सल्लागार बबन साळगावकर, अध्यक्ष बंटी माठेकर, सचिव दीपक सावंत आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.