एकमुखी दत्त मंदिरात टेंबे स्वामी जयंती होणार साजरी

Edited by: विनायक गांवस
Published on: August 11, 2025 17:52 PM
views 183  views

सावंतवाडी : श्री एकमुखी दत्त मंदिर, सबनीसवाडा येथे बुधवार, दिनांक १३ ऑगस्ट रोजी श्री टेंबे स्वामी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भाविकांनी या उत्सवात सहभागी होऊन श्री दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक व्यवस्थापन समितीने केले आहे.

श्रावण वद्य षष्ठीच्या शुभ मुहूर्तावर साजरा होणाऱ्या या उत्सवाचा प्रारंभ सकाळी ७ वाजता एकमुखी दत्त पूजा, एकादशमी व लघुरुद्र यांनी होईल. त्यानंतर सकाळी ९ वाजता श्री सत्यदत्त महापूजा करण्यात येईल. दुपारी १२:३० वाजता श्रींची आरती झाल्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे वितरण केले जाईल.

सायंकाळी ७ वाजता पुन्हा आरती होणार असून, त्यानंतर ७:३० वाजता श्री टेंबे स्वामी पालखी सोहळा काढण्यात येईल. रात्री ८:३० वाजता भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, ज्यामध्ये भाविकांना भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेता येईल. श्री दत्त मंदिर आणि वासुदेवानंद सरस्वती मंदिर, सबनीसवाडा येथे होणाऱ्या या विशेष कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्थानिक व्यवस्थापन समितीकडून करण्यात आले आहे.