
सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर 'बॅण्ड बाजा बारात' आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला. विधानसभा मतदारसंघातील रस्त्यावरील पडलेले खड्डे आणि वाढलेली झाडी येत्या दहा दिवसात मारून रस्ते वाहतुकीस सुरळीत करावे तर मजबुतीकरणाच्या नावाखाली शहरातील ऐतिहासिक जिल्हा कारागृहाच्या वाताहातिस जबाबदार असलेल्या शाखा अभियंत्यावर येत्या २५ ऑगस्टपूर्वी कारवाई व्हावी. अन्यथा, २६ ऑगस्ट रोजी एकवीस ढोलासह कार्यालयासमोर गाढव उभा करुन त्याला सलामी ठोकण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला.
ठाकरे शिवसेनेनं सावंतवाडी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा तालुकाप्रमुख मायकल डिसोजा यांनी अलीकडेच दिला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते पदाधिकाऱ्यानी येथील कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर 'बॅण्ड बाजा बारात' आंदोलन छेडले. आंदोलनाची पूर्वकल्पना देऊनही कार्यकारी अभियंता या दोडामार्ग दौऱ्यावर गेल्याने कार्यकर्ते चांगलेच भडकले. त्यांनी अधिकारी वर्गाचा निषेध व्यक्त करत जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. जोपर्यंत कार्यकारी अभियंता या ठिकाणी उत्तर देत नाहीत, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही अशी भूमिका घेतली.
अखेर दुपारी उशिरा कार्यकारी अभियंता सावंतवाडीत आल्यानंतर त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी सर्वांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. कोकणातील गणपती उत्सव हा सर्वात मोठा उत्सव असताना आपण केवळ पाहणी दौरे करत आहात. यामध्ये रस्त्यावरील पडलेले खड्डे आणि वाढलेली झाडी याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची बैठक बोलावून ज्या ज्या भागातील रस्ते खराब झालेत तेथील रस्ते येत्या दहा दिवसात खड्डे मुक्त करून वाहतुकीस सुरळीत करण्यात यावेत, बांधकाम विभाग हा भ्रष्टाचाराचे कुरण असून जे रस्ते यावर्षी नव्याने करण्यात आले त्याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. केवळ ठेकेदार आणि अधिकारी वर्गांना पाठीशी घालण्याचे काम वरिष्ठ करत आहेत. परंतु, ठाकरे शिवसेना हे सहन करणार नाही असा इशारा रुपेश राऊळ व मायकल डिसोजा यांनी दिला. यावर येत्या दहा दिवसात विधानसभा मतदारसंघातील सर्व रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत होईल असे ग्वाही कार्यकारी अभियंता यांनी दिली.
तर शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेले जिल्हा कारागृहाचे मजबुती करण्याच्या नावाखाली काम करण्यात आले. जुन्या बांधकामाचे कोणत्याही प्रकारचे स्ट्रक्चरल ऑडिट न करता त्यावर नव्याने चिऱ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे कारागृहाची भिंत कोसळली एकूणच ज्या शाखा अभियंत्याने हे काम केले त्याला या संदर्भात दोषी पकडून त्यावर कारवाईची मागणी आम्ही केली होती. परंतु केवळ चौकशीच्या नावाखाली आमची दिशाभूल करण्याचे काम प्रशासनाने केले. मात्र, यापुढे आम्ही ते सहन करणार नसून येत्या 25 ऑगस्ट पर्यंत संबंधितावर योग्य ती कारवाई व्हावी, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावे. अन्यथा, 26 ऑगस्ट रोजी ठिकाणी 21 ढोलासह गाढवाला सलामी देण्याचे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही विधानसभा प्रमुख श्री राऊळ यांनी दिला. दरम्यान यासंदर्भात आमच्या कार्यालयाकडून चौकशीचा अहवाल तयार करून तो वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल अशी ग्वाही कार्यकारी अभियंता श्रीम. इंगवले यांनी दिली. ज्या संस्थेने हे काम केले त्या संस्थेचे एकही रुपयांचे बिल यापुढे आपणाकडून अदा करण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तर एसटी महामंडळाकडून शहरातील मियासाॅब समाधी पर्यंत चार्जिंग स्टेशनसाठी खोदलेला रस्ता अद्यापही तसाच आहे. या संदर्भात पूर्णपणे निधी बांधकामकडे देऊनही त्यावर कोणत्याही काम करण्यात आले नाही. याकडे शहर संघटक निशांत तोरसकर यांनी लक्ष वेधले. तर उपअभियंता कार्यालयासमोरील रस्त्यावर ठेकेदारांकडून दोन्ही बाजूने गाड्या लावल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि अपघातासारखे प्रकार घडत आहे. त्यावरही तात्काळ मार्ग काढावा अशी ही मागणी त्यांनी केली. यावेळी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार,शहर संघटक निशांत तोरस्कर, शब्बीर मणियार, सुनील गावडे, अजित सांगेलकर, बाळू गवस, सतीश नार्वेकर, पंढरी राऊळ, शहर संघटक महिला श्रुतिका दळवी, गुरु नाईक, संतोष राऊळ, सोनू कासार, विनोद ठाकूर आधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.