
सावंतवाडी : भाजपचे कार्यकर्ते घ्यायचेच असतील तर आठ दिवसात घ्या. आम्ही पक्ष शून्यातून पुन्हा उभा करू, असे आव्हान भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिलेले असतानाच आज शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजू परब यांनी कोलगाव ग्रामपंचायतमधील चार विद्यमान सदस्य सोबत आणून सारंग यांना गावातच दणका दिला आहे. दरम्यान सारंग यांच्या डोक्यात हवा गेली आहे तरीही “बाप तो बाप होता है..”, असे सांगत पहिला तुमचा गाव सांभाळा आणि नंतर मतदार संघाच्या बाता करा, असे त्यांनी सारंग यांना सुनावले आहे. तर दीपक केसरकर हे आमचे नेते आहेत. त्यांच्या शब्दाला प्रमाण आहे. त्यामुळे प्रवेश घेणार नाही. परंतू या चौघांना सोबत घेवून आम्ही आमची ताकद दाखविली, असे प्रतिआव्हान श्री. परब यांनी दिले आहे.
महायुतीतील एकमेकांच्या पक्ष प्रवेशावरुन भाजप आणि शिंदे गटात जोरदार गृहकलह रंगला आहे. सावंतवाडी विधानसभेत होणार्या प्रवेशावरुन दोन दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत महेश सारंग यांनी त्यांना आठ दिवसात भाजपाचे कार्यकर्ते घ्या, असे आव्हान दिले होते. हाच धागा पकडून श्री. परब यांनी कोलगाव ग्रामपंचायत मधील रोहीत नाईक, प्रणाली टिळवे, संयोगिता उगवेकर आणि आशिका सावंत या चार विद्यमान सदस्यांना घेवून आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली व आणखी एक सदस्य लवकरच आपल्या सोबत येणार असल्याचा त्यांनी दावा केला.