
सावंतवाडी : कवी दीपक पटेकर (दीपी) यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानचा मानाचा पद्य विभागातील "सर्वोत्कृष्ट स्तंभलेखक" पुरस्कार ज्येष्ठ गझलकार डॉ.मनोज सूर्यकांत वराडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध गझलकार ए. के. शेख, गझलकार किरण वेताळ, साहित्यिका विनिता कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय कवी संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा कांदिवली मुंबई येथे दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय लेखन करणाऱ्या राज्यभरातील साहित्यिकांना साप्ताहिक व मासिक पद्य विभाग, गद्य विभाग स्तंभलेखक, मनस्पर्शी जीवन गौरव पुरस्कार, विशेष स्तंभलेखक असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी वर्षभरातील साप्ताहिक स्तंभलेखन उपक्रमांत सातत्यपूर्ण उत्कृष्ट पद्य लेखन केल्याबद्दल सावंतवाडी येथील कवी दीपक पटेकर (दीपी) यांचा ज्येष्ठ गझलकार डॉ.मनोज वराडे यांच्या हस्ते मानाचा "सर्वोत्कृष्ट स्तंभलेखक" पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
"स्वरचित विचारांची देवाणघेवाण" हे ब्रीद घेऊन साहित्य क्षेत्रात कार्यरत असणारे मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान साहित्य क्षेत्रातील साहित्यिकांच्या उल्लेखनीय योगदानासाठी दरवर्षी विविध क्षेत्रातील साहित्यिकांना सन्मानित करीत असते. यावेळी मनस्पर्शीने तृतीय काव्यसंमेलन आयोजित केले होते. या कवी संमेलनाला देखील राज्यभरातून निवडक ४० कवी, गझलकार सहभागी झाले होते. सर्व कविजनांना ज्येष्ठ गझलकार ए. के. शेख व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.