पूर्णवेळ फिजीशीयनसाठी सामाजिक संघटना ठाम ; आंदोलन तूर्त स्थगित !

सावंतवाडीसाठी २ ऑनकॉल फिजीशीयन नियुक्त : शल्यचिकित्सक
Edited by:
Published on: April 29, 2025 14:57 PM
views 133  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे तात्पुरत्या स्वरुपामध्ये फिजिशिअन ऑनकॉल पध्दतीने डॉ. अभिजित चितारी व डॉ. मुकुंद अंबापुरकर यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. तसेच कायम स्वरुपी डॉक्टर्स नियुक्ती करण्याचे अधिकार शासनाला असून कायमस्वरुपी नियुक्ती मिळावी या करीता आयुक्तालय आरोग्य सेवा मुंबई यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. तसेच अधिपरिचारीका, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. तसेच सामाजिक बांधिलकी व युवा रक्तदाता संघटनेकडून १ मे रोजी होणार आंदोलन मागे घेण्यात यावे अशी विनंती केली आहे. 

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात फिजीशीयन, न्युरोलॉजीस्ट व हृदयरोग मिळाला तसेच इतर सुविधांबाबत सामाजिक बांधिलकी व युवा रक्तदाता संघटनेकडून उपोषण करण्यात आले होते. उपोषण सोडताना १ मे पर्यंत पूर्णवेळ डॉक्टर न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही संघटनांकडून देण्यात आला होता. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचही याकडे लक्ष वेधण्यात आले होते. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी यासाठी पुढाकार घेत पाठपुरावा केला होता. त्यानुसार शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, तात्पुरत्या स्वरुपामध्ये फिजिशिअन ऑनकॉल पध्दतीने डॉ. चितारी व डॉ. अंबापुरकर यांना नियुक्ती आदेश देण्यात आल्याची माहिती शल्य चिकित्सकांनी दिली आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयु युनिटला स्फाट, ड्रेनेज व्यवस्था, शवविच्छेदन गृह दुरूस्तीसह इतर सुविधा पूर्णत्वास आणल्या जात आहेत. सामाजिक बांधिलकी, युवा रक्तदाता संघटनेच्या बहुतांश मागण्या पूर्ण झाल्या असून १ मे रोजीच आंदोलन मागे घेण्यात यावे अशी विनंती डॉ. पाटील यांनी केली आहे. 

दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार दीपक केसरकर यांनी येणाऱ्या भरती प्रक्रियेत फिजीशीयन देण्याचे मान्य केले आहे. येत्या महिन्याभरात तो मिळणं अपेक्षित आहे. तात्पुरत्या स्वरूपात दोन फिजीशीयनना नियुक्ती दिली असून न्युरो अन् हार्ट स्पेशालिस्ट असल्यानं तीही सेवा मिळणार आहे. मात्र, आमची मागणी ही पूर्णवेळ फिजीशीयन उपलब्ध व्हावा अशी आहे. शासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही उपोषण स्थगित करत आहोत. मात्र, येत्या महिन्याभरात पूर्णवेळ फिजीशीयन न मिळाल्यास नाईलाजास्तव पुन्हा तीव्र आंदोलन उभारावे लागेल असा इशारा युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी दिला आहे.