
सावंतवाडी : सावंतवाडी आगारात सोमवार, दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी दाखल झालेल्या नवीन गाड्यांचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून घाईगडबडीत उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र, या घाईगर्दीत गाड्यांची योग्य तपासणी न करताच पाच गाड्यांचे उद्घाटन करून त्यांना विविध मार्गांवर रवाना करण्यात आले. याचा फटका पहिल्याच दिवशी प्रवाशांना बसला. सावंतवाडी-रत्नागिरी मार्गावर धावणारी एक नवीन गाडी कणकवली स्थानकातून निघाल्यानंतर केवळ दहा किलोमीटरच्या अंतरातच तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. यामुळे गाडीतील प्रवाशांना अर्ध्या रस्त्यातच उतरण्याची वेळ आली. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि सत्ताधाऱ्यांच्या श्रेय लाटण्याच्या प्रयत्नांमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या बाबत अनुप नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
त्यानंतर प्रवाशांना मिळेल त्या दुसऱ्या गाडीतून त्यांच्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले, तर बिघडलेली नवीन गाडी दुरुस्तीसाठी कणकवली येथील शोरूममध्ये न्यावी लागली. पहिल्याच दिवशी झालेल्या या प्रकारामुळे जिल्ह्यात दाखल झालेल्या नवीन गाड्यांच्या गुणवत्तेवर आणि भविष्यावर प्रवाशांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या गाड्या खरंच नवीन आहेत की महामंडळाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा हा प्रकार आहे, असा सवाल प्रवाशांमधून विचारला जात आहे.
या संदर्भात एसटी कामगार सेना (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाध्यक्ष श्री अनुप नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "मोठा गाजावाजा करत सीएनजी गाड्या सिंधुदुर्गात दाखल झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र, महाराष्ट्रातील इतर आगारातून मोडीत काढलेल्या गाड्यांमध्ये लाखो रुपये खर्च करून केवळ सीएनजी इंजिन बदलून त्या जिल्ह्यात आणल्या गेल्या आहेत का, अशी शंका निर्माण होत आहे. अशा प्रकारांमुळेच एसटी महामंडळ तोट्यात चालले आहे आणि प्रवाशांचा विश्वास या सेवेवरून उडत चालला आहे. याचा विचार प्रशासन कधी करणार?"
पहिल्याच दिवशी नवीन गाडीत बिघाड झाल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. तसेच, दाखल झालेल्या इतर गाड्यांचीही योग्य तपासणी करावी, जेणेकरून भविष्यात प्रवाशांना असा त्रास सहन करावा लागणार नाही, अशी खबरदारी घ्यावी असे आवाहन अनुप नाईक यांनी केले आहे.