सावंतवाडी बनली तुंबावाडी..!

Edited by: विनायक गांवस
Published on: July 07, 2024 09:21 AM
views 995  views

सावंतवाडी : शहरात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेत गुडघाभर पाणी साचलं. काही दुचाकी देखील पाण्यात अडकल्या होत्या. परिसरातील दुकानांत पाणी शिरू लागले होते. सहसा कधीही न तुंबणारी सावंतवाडी पाण्यात गेल्यानं सावंतवाडीची तुंबावाडी बनली होती.

पहाटे पासूनच शहरासह ग्रामीण भागात पावसाने थैमान घातला.  तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडली असल्यानं अनावश्यक कामा करीता घराबाहेर पडणे टाळावे, सतर्क व सुरक्षित रहावे असे आवाहन तहसीलदार सावंतवाडी तथा अध्यक्ष तालुका आपत्ती  व्यवस्थापन सावंतवाडी श्रीधर पाटील यांनी केले होते. दरम्यान, दुपार पर्यंत पावासाचा जोर कायम राहील्याने शहरासह बांदा येथील बाजारपेठेत पाणी साचले. ग्रामीण भागात देखील रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. नदीच्या पातळीत वाढ झाली होती. 

शहरात बाजारपेठेत दुकानांत पाणी शिरू लागले होते. भौगोलिक रचनेनुसार उंचावर असलेल्या या शहरात सहसा पाणी साचत नाही. ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने रविवारी बाजारपेठ पाणी तुंबले. रविवारी दुकान बंद असल्याने व्यापारी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली होती. काहींच्या दुकानात पाणी शिरल्याने नुकसानीस सामोरं जावं लागलं. 

सफाई मित्रांची चोख कामगिरी

तुंबलेल्या सावंतवाडीमुळे नालेसफाईचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसापुर्वी योग्य पद्धतीने नालेसफाई झालेली का ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. रविवारी पाणी साचल्याच समजताच नगरपरिषदेचे सफाई मित्र रस्त्यावर उतरले. गटार मोकळी करत त्यावरील फरशा बाजूला करत पाण्याला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे अवघ्या काही वेळात साचलेल पाणी ओसरू लागले. दुपारनंतर काही प्रमाणात पावसाचा वेगळी मंदावल्याने शहरवासियांनी सुटकेचा निःश्वास सोडला.