विठू नामाच्या गजरात सावंतवाडी नगरी दुमदुमली

Edited by: विनायक गांवस
Published on: July 17, 2024 12:49 PM
views 184  views

सावंतवाडी : प्रतिपंढरपूर सावंतवाडीत आषाढी एकादशी मोठा उत्साह साजरी करण्यात आली. पहाटे काकड आरती, विठ्ठल रखुमाईला दह्या, दु़धाचं स्नान घालून सोहळ्यास प्रारंभ झाला. दिवसभर विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांची मांदीयाळी विठ्ठल मंदिरात होती‌.  विठू नामात सावंतवाडी नगरी दुमदुमून गेली होती.

प्रतिपंढरपूर मानलं जाणाऱ्या सावंतवाडी विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आषाढी स्नान पुजेचा मान यंदा श्री व सौ. सुनील निरवडेकर यांना प्राप्त झाला. नवदाम्पत्य श्री व सौ. सचिन मोरजकर यांनी ही विठ्ठल सेवा केली. पहाटे काकड आरतीनं उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर विठ्ठल-रखुमाईला दह्या, दु़धाचा स्नान विधी पुरोहितांच्या मंत्रोच्चारात पार पडला. सकाळपासूनच विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी मंदीरात केली होती‌. दुपारी अभंग, भक्तीगीत, भजनाचे कार्यक्रम झाले. दिवसभर विविध धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांची मांदीयाळी होती‌. 

विठू नामाच्या गजरात सावंतवाडी नगरी दुमदुमून गेली होती. सायंकाळी ह.भ.प. संज्योतताई केतकर पुणे यांची किर्तन सेवा पार पडली. पुढील ३ दिवस त्या किर्तनरूपी सेवा करणार आहेत. रविवारी २१ जुलैला काल्यान सांगता होणार आहे. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन विठ्ठल मंदिर कमिटीन केलं आहे.