पर्यटननगरीला वेध महोत्सवाचे !

सावंतवाडीकरांना खुणावतोय 'पर्यटन महोत्सव' !
Edited by: विनायक गावस
Published on: December 07, 2023 17:54 PM
views 694  views

सावंतवाडी : डिसेंबर महिन्याचा दिवसेंदिवस नववर्षाच्या दिशेने आगेकूच करत असल्यानं २५ वर्षांपूर्वी घोषीत झालेल्या पर्यटन जिल्ह्यातील पर्यटननगरीला पर्यटन महोत्सव खुणावत आहे. गेली चार वर्षे कोणत्या न कोणत्या कारणानं सावंतवाडीकरांना त्यांच्या जिव्हाळ्याचा पर्यटन महोत्सवापासून वंचित राहावं लागत आहे. निदान यंदाच्या पर्यटन महोत्सवातून २०२३ ला निरोप देत २०२४ चं धुमधडाक्यात स्वागत करण्याची संधी सावंतवाडीकरांना मिळेल अशी आशा सर्वस्तरातील सावंतवाडीकर उराशी बाळगून आहेत. तशी अपेक्षा देखील ते व्यक्त करत आहेत.


२००४ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष व विद्यमान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या व सहकारी नगरसेवकांच्या संकल्पनेतून पहिल्यांदा सावंतवाडी पर्यटन महोत्सव शहरात भरवला गेला. पहिल्याच लोकोत्सवाला सावंतवाडीकरांनीच नव्हे तर जिल्हावासियांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर जिल्हाभरात अशा पर्यटन महोत्सवांच आयोजन होऊ लागलं. 'परमेश्वराला पहाटे पडलेलं एक गोड स्वप्न' असा उल्लेख ज्या शहराचा केला जातो त्या शहरात होणारा पर्यटन महोत्सव म्हणजे जुन्या आठवणींना मागे सारत इंग्रजी नवं वर्षाचं नव्या उमेदीनं स्वागत करण्याचा जणू एक सोहळाच.  राजेसाहेब शिवरामराजेंच्या पुतळ्याच्या साक्षीनं गुलाबी थंडीत मोती तलाव काठी भरणारा हा महोत्सव म्हणजे वर्षभर पुरेल असा स्वर्गीय आनंद देणारा एक क्षण होता. यानिमित्त हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील प्रतिभावंत कलाकार, दिग्गज मंडळीची सुंदरवाडीत असणारी रेलचेल, तलावातून निघणारी शोभायात्रा, रंगावली- चित्र प्रदर्शन, जीभेला विश्रांती न देणाऱ्या खवय्यांसह मनोरंजनाची खमंग मेजवानी म्हणजे हा महोत्सव. या महोत्सवाच्या दिवसांत नवचैतन्यच या नगरीला यायच‌. सिंधुदुर्गसह गोवा, कर्नाटकातील पर्यटक या काळात इथं वास्तव्यास असायचे‌ ते हा सोहळा अनुभवण्यासाठी. या महोत्सवासाठीची तयारी, छोट्या मोठ्या उपक्रमात दडलेला दृष्टीकोन. कला, नृत्य, गायन, वादन, अभिनय, साहित्यांसह सर्वांना मिळणारं व्यासपीठ अन् मिळणारी शाबासकीची थाप बळ देणारं असायचं. पण कुणाची दृष्ट याला लागली अन् गेल्या चार वर्षांत हे सुख सावंतवाडीकरांच्या नशिबातून हिरावल गेल. २०१९ ला पोटनिवडणुकीची आचारसंहिता, पुढची दोन वर्ष कोरोनाचं महाभयंकर संकट अन् त्यानंतर आजतागायत असलेली प्रशासकीय राजवट. यामुळे सावंतवाडीच सुख कुठेतरी हरपल्यासारख वाटू लागलं आहे. प्रशासकीय राजवटीत यंदा देखील हा महोत्सव होईल अशी शाश्वती दिसत नाही. 


माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या माध्यमातून देखील भव्य दिव्य असा सुंदरवाडी महोत्सव जिमखाना मैदानावर व्हायचा. तोही एक पर्वणीच ठरायचा. कोरोनानंतर सावंतवाडीकरांच्या मनोरंजनाची भुक ओळखली ती महिलाशक्तीनं. गेल्यावर्षी इनरव्हील क्लबच्या महिलांनी पुढाकार घेतल्यानं मिनी महोत्सवातून मनोरंजनात्मक थोडा दिलासा मिळाला. त्यासह विविध सामाजिक, सांस्कृतिक मंडळांच्या माध्यमातून छोटेमोठे महोत्सवही गेल्या वर्षात झाले. यंदाही तशीच लगबग सुरू आहे. मात्र पर्यटन महोत्सवाच ते रूप, ती जागा इतर महोत्सवांना दिली जात नाही. त्यामुळे मिनी महोत्सवातच गोड मानून घ्याव लागतय. सावंतवाडीच्या मनावर अधिराज्य गाजवणारा पर्यटन महोत्सव आठवणीच्या पटलावरच रंगवावा लागतोय. त्यामुळे अचानक जादुची कांडी फिरेल अन् हरवलेलं सुख पुन्हा येईल या आशेत सावंतवाडीकर नववर्षाच्या स्वागताची प्रतिक्षा मात्र करतोय.