
सावंतवाडी : रात्रीच्या वेळी प्रवाशांच्या मदतीसाठी आणि सुरक्षेसाठी आवश्यक असलेले सावंतवाडी बस स्थानकातील नियंत्रण कक्ष पूर्णपणे रिकामे होते. त्यामुळे बस स्थानकाचा कारभार रामभरोसे सुरू होता. पुण्यासारख्या गजबजलेल्या बस स्थानकातील घटना लक्षात घेता सावंतवाडीतील या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
रात्री सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास हा प्रकार निदर्शनास आला. नियंत्रण कक्षात केवळ खुर्च्या असल्याने प्रवाशांना कोणताही मदतीचा हात मिळाला नाही. तसेच आगार व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुख यांचे दूरध्वनी क्रमांक येथे आहेत. मात्र, ते लागत नसल्यामुळे संतप्त प्रवाशांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा बस स्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना काही अडचणी आल्यामुळे त्यांनी नियंत्रण कक्षात जाऊन मदत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, नियंत्रण कक्ष पूर्णपणे रिकामा होता. तिथे केवळ खुर्च्या आणि इतर सामान होते. एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. यामुळे कोणत्या बस कोणत्या फलाटावर येणार किंवा इतर कोणत्याही माहितीसाठी प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागले. महिला, ज्येष्ठांसह उपस्थित प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागला.नियंत्रण कक्षात कोणीही नसल्यामुळे काही प्रवाशांनी स्थानकात लावण्यात आलेल्या फलकावर दिलेल्या आगार व्यवस्थापक आणि स्थानक प्रमुख यांच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे दोन्ही क्रमांक बंद होते. यामुळे, तातडीच्या वेळी संपर्क साधता येण्यासारखी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसल्याचे स्पष्ट झाले.
सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या महत्त्वाच्या स्थानकात हे गैरव्यवस्थापन समोर आल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. बस स्थानकातील या बेजबाबदार कारभाराबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली असून या प्रकाराची गंभीर दखल घेऊन आगार प्रमुख, स्थानक प्रमुख आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असणे हे एस.टी. प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र, त्याचा भंग झाल्याचे या घटनेतून सिद्ध झाले आहे. यामुळे सावंतवाडी बस स्थानकाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.