
सावंतवाडी : 'परमेश्वराला पहाटे पडलेल एक अधूरं स्वप्न' असं वर्णन ज्या शहराचं कवीवर्य डॉ. वसंत सावंत यांनी केल ती सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी. या शहरातला सेल्फी पॉईंट सध्या चर्चेत आहे. सावंतवाडीची ओळख असलेल्या लाकडी खेळण्यांच प्रतिक म्हणून इथे लाकडी फळांचा करंडा बसविण्यात आला आहे. मात्र, नाका पेक्षा 'सेल्फी पॉईंट' जड अशी काहीशी परिस्थिती या ठिकाणी पहायला मिळत आहे.
ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर श्रीराम वाचन मंदिरसमोरील भाग हा सेल्फी पॉईंट म्हणून ओळखला जातो. या एकाच ठिकाणाहून ट्राय अॅंगल सावंतवाडीच्या सौंदर्याच दर्शन होतं. संजू परब नगराध्यक्ष असताना तिथे किल्ल्याची प्रतिकृती असणारा सेल्फी पॉईंट उभारला जात होता. मात्र, तो पूर्णत्वास आला नाही. शहराच सौंदर्य झाकलं जातंय म्हणून तो नुकताच हटवला गेला. त्या ऐवजी दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, सावंतवाडी नगरपरिषद व लोकसहभागातून सेल्फी पॉईंटच रूप पालटण्यासाठी पुढाकार घेतला गेला. भव्य कमान, नव रेलिंग, लक्षवेधी असा फळांचा करंडा येथे उभारण्यात आला. मात्र, फळांचा करंडा एवढा मोठा झाला की नाकापेक्षा सेल्फी पॉईंट जड असं म्हणायची वेळ आली. ज्या मोती तलावाच व शहरात सौंदर्य झाकलं जातंय म्हणून आधीचा बुरूज हटवला गेला तिथे त्यापेक्षा मोठा करंडा बसवला. यामुळे सावंतवाडीच सौंदर्य करंड्यामागे लपलं गेलं. चांगली संकल्पना असताना करंड्याचा आकार सौंदर्याच्या आड आला. नागरिकांमध्ये या विषयी नाराजी दिसून येत आहे. तर पूर्वीचा उभारलेला बुरूज हटविला त्यातला निधीही वाया गेल्याचं बोलल जात आहे.
एवढंच नाही तर फळांच्या करंड्यामुळे सेल्फी पॉईंटची जागाही व्यापली गेली. या ठिकाणी पहाटे, सायंकाळी बसणाऱ्या लोकांना व्यत्यय आणणारा ठरत आहे. पाडवा पहाट सारखा कार्यक्रम तसेच इतरही सांस्कृतिक, साहित्यिक, संगीत मैफीली या ठिकाणी भरत होत्या. परंतु, जागा व्यापली गेल्यानं यालाही आता ब्रेक लागणार आहे. त्यामुळे या फळांच्या करंड्याबाबत पूनर्विचार व्हावा अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे.
याबाबत मुख्याधिकारी सागर साळुंखे म्हणाले, केशवसुत कट्ट्याच्या धर्तीवर हा सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, सावंतवाडी नगरपरिषद व लोकसहभागातून याच काम करण्यात आल आहे. या आधीचा चौथरा हटविण्यात आला. त्या कामाच कोणतंही बील अदा करण्यात आलेल नाही. त्यामुळे निधीचा अपव्यय झालेला नाही. यावेळी उभारण्यात आलेला पॉईंट हा दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, सावंतवाडी नगरपरिषद व लोकसहभागातून आहे अशी प्रतिक्रिया दिली.