टीजेएसबी बँकेतून सावंतवाडीकरांना दर्जेदार बँकिंग सेवा मिळेल !

माजी मंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते १५० व्या शाखेच उद्घाटन
Edited by:
Published on: May 13, 2025 14:06 PM
views 172  views

सावंतवाडी : सावंतवाडी अर्बन बँकेच्या टीजेएसबी सहकारी बँकेत झालेल्या विलीनीकरणामुळे सावंतवाडीकरांना दर्जेदार बँकिंग सेवा मिळेल. विलीनीकरणामुळे बँकिंग सेवा दुर्गम भागांपर्यंत पोहोचतात. यामुळे आर्थिक समावेशाला चालना मिळेल, स्थानिक ग्राहकांना मजबूत आर्थिक पर्याय मिळतील व सहकारी बँकिंग क्षेत्र अधिक स्थिर बनेल असे प्रतिपादन  माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. सावंतवाडी अर्बन बँकेचे विलीनीकरण टीजेएसबीत झाले. याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, कोकणी जनतेमुळे मी राजकीय जन्म घेऊ शकलो. त्यांना मी आयुष्यात विसरू शकणार नाही. त्यामुळे पुढील सर्व आयुष्य कोकणी जनतेच्या उत्कर्षासाठी काम करेन, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. श्री. सुरेश प्रभू यांच्या हस्ते तर माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या प्रमुख उपस्थितीत सावंतवाडी येथे टीजेएसबी सहकारी बँकेच्या १५० व्या शाखेचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे टीजेएसबी सहकारी बँकेत झालेले यशस्वी विलीनीकरणही मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. 

टीजेएसबी सहकारी बँकेने तिच्या १५० व्या शाखेचे भव्य उद्घाटन करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे, जो सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या यशस्वी विलीनीकरणासह साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी मंत्री दीपक केसरकर, बँकेचे अध्यक्ष शरद गांगल,  बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर, उपाध्यक्ष वैभव सिंगवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अर्जून चांदेकर, सौ. उमा प्रभू, अँड. सुभाष पणदुरकर, रमेश बोंद्रे, रमेश पै, अच्युत सावंत भोसले, अशोक दळवी, राजन पोकळे, प्रसाद देवधर, नकुल पार्सेकर, वाय.पी. नाईक, गोविंद वाडकर, सीमा मठकर, व्यवस्थापक सुनील परब आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्याचे विशेष अतिथी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, "या विलीनीकरणामुळे सिंधुदुर्ग विभागातील आर्थिक पायाभूत सुविधेला बळ मिळणार आहे. टीजेएसबी बँकेचे व्यापक नेटवर्क, आधुनिक तंत्रज्ञान व ग्राहककेंद्रित सेवा स्थानिक उद्योजकांना, व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक बँकिंग सेवा देईल. हे पाऊल आर्थिक समृद्धीकडे जाणारा मार्ग ठरेल." असे गौरवोद्गार काढले.  तर  या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल बोलताना टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितले, "हे विलीनीकरण हा केवळ आमचा विस्तार नाही, तर आम्ही को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रातील आमची उपस्थिती अधिक व्यापक करत आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा व कोकण विभागातील आमचा विस्तार आता अधिक बळकट झाला आहे. या भागातील नागरिक, व्यावसायिक, उद्योजक यांना उत्तम बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा टप्पा आम्हाला सर्वसमावेशक आर्थिक विकासाच्या दिशेने पुढे नेणारा आहे. आम्ही कायम सर्व भागधारकांच्या हितासाठी शाश्वत वाढीवर विश्वास ठेवतो. सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विलीनीकरणामुळे आमचे को-ऑपरेटिव्ह बँकिंग नेटवर्क अधिक मजबूत झाले आहे. आमचा उद्देश आहे की, ग्राहकांना उत्तम बँकिंग अनुभव देताना, आर्थिक स्थैर्य व सुविधा यांचे संतुलन राखले जावे." असे ते म्हणाले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक सूचनांनुसार ही विलीनीकरण प्रक्रिया अंमलात आणण्यात आली आहे. सहकारी बँकिंग क्षेत्राच्या मजबुतीसाठी रिझर्व्ह बँकेने सुचवलेल्या धोरणात्मक उपायांमध्ये हे विलीनीकरण महत्त्वपूर्ण ठरले आहे. रिझर्व्ह बँकेने दिनांक ९ मे २०२५ रोजी आपल्या संकेतस्थळावर यासंदर्भात अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषणा केली होती. या धोरणात्मक विस्तारामुळे बँकेची सेवा क्षमता अधिक बळकट झाली असून, वाढत्या ग्राहकवर्गासाठी अधिकाधिक मूल्यवर्धित सेवा पुरवण्याची तयारी बँकेने केली आहे.

टीजेएसबी सहकारी बँकेने पाच राज्यांतील आपल्या पारदर्शक व परिणामकारक बँकिंग कार्यपद्धतीच्या जोरावर हे विलीनीकरण यशस्वीपणे पूर्णत्वास नेले आहे. संपूर्ण नियामक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व नऊ शाखा मंगळवार, दिनांक १३ मे  पासून टीजेएसबी सहकारी बँकेच्या शाखा म्हणून कार्यरत झाल्या आहेत. त्यामुळे टीजेएसबी बँकेच्या शाखांची संख्या १४९ वरून १५८ पर्यंत वाढली आहे. यामध्ये सावंतवाडी येथील मुख्य शाखेचे उद्घाटन टीजेएसबी बँकेची १५० वी शाखा म्हणून करण्यात आले.     यासोबतच सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील सर्व कर्मचारी टीजेएसबी बँकेत पूर्णतः समाविष्ट झाले आहेत, ज्यामुळे त्यांच्या सेवा अखंडित राहतील. टीजेएसबी सहकारी बँक ही देशातील आघाडीची सहकारी बँक असून, १९७२ साली स्थापन झालेली ही बँक आज महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक आणि मध्यप्रदेश या पाच राज्यांमध्ये यशस्वीरित्या कार्यरत आहे. एप्रिल २०२५ अखेरीस बँकेचा एकूण व्यवसाय २३,१०५ कोटी रुपयांवर पोहोचला असून, त्यापैकी ८,२५६ कोटी रुपये कर्जवाटप व १४,८४९ कोटी रुपये ठेवी आहेत. बँकेने आपल्या पारदर्शक व ग्राहककेंद्रित कार्यपद्धतीच्या जोरावर सहकारी बँकिंग क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण केली आहे. या विलीनीकरणामुळे टीजेएसबी सहकारी बँकेने आपल्या विस्तार आणि सेवांच्या गुणवत्तेत आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे, ज्यामुळे सहकारी बँकिंग क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे.