टर्मिनसचा नाही पत्ता, स्वप्न रेस्टॉरंटचं !

Edited by: विनायक गांवस
Published on: February 03, 2024 14:58 PM
views 455  views

सावंतवाडी : 'रत्नसिंधू' योजनेतील सर्व निधी खर्च करण्याच्या दृष्टीने आखण्यात आलेल्या योजनाना मान्यता देण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी गती देण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. यात सावंतवाडी रेल्वे टर्मिनस येथे रेस्टॉरंट व निवासी व्यवस्था केली जाणार आहे‌. शालेय शिक्षणमंत्री  तथा योजनेचे अध्यक्षदीपक केसरकर यांनी रत्नसिंधूच्या बैठकीत ही बाब स्पष्ट केलीय. यामुळे आता गेली दहा वर्षे ज्या रेल्वे टर्मिनसच्याच सावंतवाडीकर प्रतिक्षेत आहेत. २६ जानेवारी रोजी हक्काचा गाड्यांसाठी देखील जनआंदोलन उभारण्याची वेळ ज्या जनतेवर आली त्यांना आता रेल्वे टर्मिनसवरील रेस्टॉरंटच गोड स्वप्न पडू लागलं आहे. एकीकडे रेल्वे टर्मिनसचा प्रश्न भिजत घोंगडं असताना केसरकरांनी मात्र 'रेस्टॉरंटच' सुंदर स्वप्न दाखवलं आहे.


२०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत  सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच भुमिपूजन मोठ्या दिमाखात पार पडलं. यावेळी दीपक केसरकर हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. या भुमीपुजनानंतर युती सरकारच्या काळात फेज-वनच काम पुर्णत्वास आलं. मात्र, फेज -२ च्या पुर्णत्वाच्या प्रतीक्षेत सावंतवाडीकर आजही आहेत. एवढी वर्ष लोटूनही टर्मिनस काम काही पुर्ण झालेलं नाही. टर्मिनस सोडाच आता तर हक्काचा गाड्यांना थांबा मिळावा यासाठी इथल्या लोकांना लढा उभारावा लागतोय. कोकण रेल्वेकडे त्यासाठी निधीच उपलब्ध नाही अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे भुमिपूजन केलेली 'टर्मिनसची पाटी' आता झाडाझुडुपांमध्ये हरवत चालली आहे. 

   २६ जानेवारीला सावंतवाडीकरांनी यासाठीच लाक्षणिक उपोषणाद्वारे जनआंदोलन केलं. केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या आश्वासनाअंती ते तुर्त स्थगित करण्यात आलय. त्यातच एकीकडे रेल्वे टर्मिनसच अपुर असलेले स्वप्न आणि आता एक मंत्री दीपक केसरकर यांनी दाखवलेल रेस्टॉरंटचे नवं गोड स्वप्न  सावंतावडीकरांना सतावू लागल आहे.


इतकचं नव्हे तर जिल्हा नियोजनमधून रस्ता व अन्य सुविधा देऊन सावंतवाडी रेल्वे टर्मिनस दर्जात्मक व पर्यटनदृष्ट्या अनुकुल बनविणेसाठी मुंबईत रेल्वेचे मॅनेजिंग डायरेक्टर व पर्यटन विकास महामंडळांच्या अधिकाऱ्यांसह बैठकही झाली. त्यादृष्टीने आराखडा तयार केल्याचही मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले आहे. तिलारी पर्यटन,  बॅक वॉटर टुरिझम, कवितांचं गाव, तंबू रिसॉर्ट आदींवरही केसरकरांनी सकारात्मक चर्चा नुकत्याच झालेल्या सिंधुरत्न बैठकीतही झाली आहे‌. इतकचं नव्हे तर मंत्री दीपक केसरकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. अलीकडे तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेही केसरकर यांचे सुर चांगले जुळताना दिसतायेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाच कामही युद्धपातळीवर सुरू आहे. आणि अशातच रेल्वे टर्मिनसवर रेस्टॉरंटच एक नवं व्हीजन केसरकरांनी मांडल आहे. त्यामुळे ते स्वप्न पुर्ण व्हाव, रेस्टॉरंटसह टर्मिनसही पुर्णत्वास यावं अशी भावना सावंतवाडीकर व्यक्त करत आहे. 


*मंत्री केसरकरांकडून मोठ्या अपेक्षा !*


पर्यटन विकास व त्यासाठीच्या योजना याबरोबरच सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अलीकडे मंत्री दीपक केसरकर एक पाऊल पुढे असतात. या आदी तेवढं पाठबळ त्यांना मिळत नव्हत. मात्र, आता सरकारमधील ते महत्त्वाचे मंत्री आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय आहेत‌. ज्यांच्याशी एक दशक संघर्ष झाला ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचेशीही विकासासाठी ते एकत्र आले आहेत. त्यामुळे विकासाच्या गाडीला ते मंत्री राणेंच्या साथीने आणि राज्य सरकार मधील कॅबिनेट मंत्री असल्यानं सामान्यांच्या मोठ्या अपेक्षा दीपक केसरकर यांचेकडून आहेत. रेल्वे टर्मिनस, रेस्टॉरंटसह ते इतरही पर्यटन प्रकल्प मार्गी लावतील व ते प्रत्यक्षात कार्यन्वीत होतील अशी आशाही सावंवाडीकराना आहे. त्यामुळे सावंतवाडीकरांच रेल्वे टर्मिनस व रेल्वे टर्मिनस येथील आता घोषणा झालेलं रेस्टॉरंट पूर्ण करणं हे मोठं चॅलेंज मंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर उभे राहणार आहे.