
सावंतवाडी : तत्कालीन युती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ जून २०१५ रोजी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन झाले होते. मात्र, गेल्या नऊ वर्षात टर्मिनस कामाचा थांगपत्ता नाही. केवळ भूमिपूजन करणाऱ्यांच्या नावांची कोनशीला अद्यापही उभी आहे. यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसबाबत जिल्हावासीयांच्या अशा पल्लवीत झाल्यात. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.
२७ जून २०१५ रोजी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन झाले. तेव्हा पालकमंत्री दीपक केसरकर होते. आता या कोनशिलेला येत्या जून महिन्यात दहा वर्षे पूर्ण होतील. भूमिपूजनानंतरही आजतागायत रेल्वे टर्मिनस काम पूर्णत्वास आलेले नाही. अथवा ते होईल याची शाश्वतीही दिसत नाही. त्यात भर म्हणजे येथे थांबणाऱ्या गाड्यांचेही थांबे मध्यंतरी काढून घेतले गेले. त्यामुळे २०१५ ला देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेला भुमिपूजन सोहळा हा येथील जनतेच्या डोळ्यांत धुळफेक करणारा होता का ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. मागील ९ वर्ष सातत्याने सावंतवाडी करांची फसवणूक करण्याच काम कोकण रेल्वे करतय की राज्यातील लोकप्रतिनिधी हा देखील एक मोठा प्रश्न आहे. यातच आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. राज्याच्या सर्वोच्च पदावर विराजमान झालेत. त्यामुळे सावंतवाडी टर्मिनसच्या विषयाला पुन्हा आशेचा किरण दिसू लागला. भूमिपूजनानंतर अर्धवट राहीलेले हे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णत्वास आणावं अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटना तसेच प्रवासी वर्गातून व्यक्त होत होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस सावंतवाडीकर जनतेच्या अपेक्षा पूर्ण करतात ? आपलं अर्धवट राहीलेले काम कसं पूर्णत्वास नेतात अन् धुळ खाणाऱ्या कोनशिलेला 'अच्छे दिन' कसे दाखवतात हे पहावं लागणार आहे.
खासदार, आमदारांकडून अपेक्षा !
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या बैठकीत नुकतंच सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या अपूर्ण कामासंदर्भात सखोल चिंतन केले गेले. कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग हा मध्य रेल्वेला हस्तांतरित करावा असा एकमुखी ठराव यात घेण्यात आला. तसेच सावंतवाडी येथील अपूर्ण टर्मिनससाठी जर कोकण रेल्वे महामंडळ आणि राज्य शासन निधीची तरतूद करण्यास असमर्थ असल्यास हे अपूर्ण काम केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेतून करावा त्यासाठी येथील खासदार नारायण राणे आणि आमदार दीपक केसरकर यांनी योग्य तो पाठपुरावा करावा. त्यासाठी संघटनेकडून संबंधित लोकप्रतिनिधींना सखोल,अभ्यासपूर्ण निवेदन देण्यासंदर्भात चर्चा झाली. याबाबतच्या मागण्या येत्या ३० दिवसात पूर्ण न झाल्यास २६ जानेवारीला रेल रोको करण्यात येईल असे एकमुखी ठरवण्यात आले.