'टर्मिनस'ची सरकाराला करून दिली जाग !

भूमिपूजनाचा फोटो केला व्हायरल ; 'तो' बोर्ड तात्काळ बदलण्याची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: July 08, 2024 15:20 PM
views 291  views

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, सुशोभीकरणात प्रवेशद्वारावर रेल्वे टर्मिनस ऐवजी सावंतवाडी रोड असा बोर्ड लावल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या प्रकाराबद्दल रेल्वे प्रवासी संघटना सक्रिय झाल्या असून याबद्दल त्यांनी निषेधही नोंदविला आहे. सुरेश प्रभू, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन झालेलं असताना टर्मिनस काही अद्यापपर्यंत पूर्णत्वास आल नाही. मात्र, आता सुशोभीकरणा दरम्यान टर्मिनसच नाव देखील न लावल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे.


रेल्वे प्रवासी संघटनेकडून सावंतवाडी रेल्वे टर्मिनस भूमिपूजनाचा फोटो शेअर करत सरकारला टर्मिनसची आठवण करून दिली आहे. सावंतवाडी रोड हा बोर्ड त्वरित हटवून सावंतवाडी टर्मिनस असा बोर्ड लावावा अशी मागणी संघटनेने केली आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन 9 वर्षापूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले होते. मात्र, रखडलेल हे काम आजतायगत पूर्ण झालेल नाही. कोकण रेल्वे प्रवासी संघटनांने याबाबत कित्येकदा आवाज उठवला. मात्र आश्वासनांशिवाय हाती काहीच आले नाही. आता तर स्थानकाच्या नावातून "टर्मिनस” हा शब्द हटवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे भूमिपुजनाचा फोटोच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून शेअर करत सरकारला टर्मिनसची आठवण करून दिली गेली आहे.


दरम्यान, सुशोभीकरणासह  सावंतवाडीत लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळणही तेवढच गरजेचे आहे. टर्मिनस झाल्यास वसई/बोरिवली-सावंतवाडी, पुणे-सावंतवाडी, कल्याण-सावंतवाडी या महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या गाड्या सोडणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर गणेश चतुर्थी, होळी या सारख्या सणांसाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्या दक्षिणेकडे न पाठवता सावंतवाडी पर्यंत मर्यादित करणे शक्य झाले असते. त्यामुळे सध्या गुराढोरांसारखा प्रवास करण्याऱ्या कोकणकरांचा प्रवास चांगला सुखकर झाला असता. यासाठी टर्मिनसच फेज टूच काम मार्गी लावून ते पूर्ण करावं. तसेच याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांच नाव देण्यात यावे अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात येत आहे.