सावंतवाडी पं. स. ची तब्बल ४ वर्षांनंतर पहिली मासिक सभा

जुन्या इमारतीची निर्लेखन प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: March 24, 2026 18:38 PM
views 20  views

सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समितीची पहिली मासिक सभा तब्बल ४ वर्षांनंतर नूतन सभापती सुस्मिता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. बसण्यासाठी जागा नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली होती. पंचायत समितीची नवीन इमारत मंजूर झाली असली तरी जुन्या इमारतीची निर्लेखन प्रक्रिया रखडली आहे. ती तातडीने पूर्ण करण्यासाठी ठराव घेण्याची मागणी उपसभापती गौरव मुळीक यांनी केली. तसेच सभागृहाचे कामकाज विनाअडथळा सुरू राहण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडे पर्यायी सभागृह उपलब्ध करून देण्याची विनंती प्रशासनाने करावी असेही निर्देश त्यांनी दिले.


सावंतवाडी पंचायत समितीची पहिली मासिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये शिक्षकांअभावी बंद पडत चाललेल्या शाळा, प्राथमिक आरोग्य विभागातील समस्या, कृषी, बांधकाम, आरोग्यासह शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, पंचायत समिती सदस्य उत्कर्षा गांवकर, प्रणाली टिळवे, धनश्री मराठे, प्रथमेश सावंत, शरद धाऊसकर, महेश धुरी, प्राजक्ता केळुसकर, जितेंद्र गांवकर, प्रशांत सुकी आदी उपस्थित होते.