प्रलंबित विकासकामांच्या निषेधार्थ उपोषण

Edited by: लवू परब
Published on: March 24, 2026 20:13 PM
views 14  views

दोडामार्ग : मौजे विर्डी येथे विविध प्रलंबित विकासकामांच्या निषेधार्थ आज दि. २४ मार्च मंगळवारी रोजी सकाळी १० वा. ग्रामस्थांनी मुख्य रस्त्यावरील पानसकल पुलाजवळ उपोषण छेडले आहे. गावातील मूलभूत सुविधांचा अभाव, अपूर्ण कामे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

गावातील मुख्य रस्त्यावरील पानसकल पूल मोडकळीस आल्यामुळे वाहतुकीस मोठा धोका निर्माण झाला आहे. तसेच खेळाच्या मैदानाशेजारील पुलावर संरक्षण भिंत नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांचा तोल जाऊन अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. मागील वर्षात दोन गंभीर अपघात घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याशिवाय, विर्डी गावातील अंतर्गत रस्त्यांवर पक्क्या गटारांची कमतरता, विर्डी ते वज्ररासकला धबधब्यापर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण न झाल्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे.

 पुनर्वसन वाडीतील वीज समस्या गंभीर

विर्डी पुनर्वसन भागात गेल्या दोन वर्षांपासून पाच वीज पोल मंजूर असूनही अद्याप बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्या भागातील नागरिक अंधारात जीवन जगत असून, मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे या ठिकाणची विजेची समस्या देखील मार्गी लावावी अशी देखील मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. 

मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार 

ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, वरील सर्व मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन कामे सुरू करण्यात आली नाहीत, तर उपोषण अधिक तीव्र करण्यात येईल. या उपोषणात उपसरपंच एकनाथ गवस, ग्रा. पं. सदस्य सुरेश गवस, ब्रम्हनाथ गवस, दीक्षा बांदेकर, उर्मिला गवस, निकिता गवस, पद्मजा गवस, यांच्यासह ग्रामस्थ मडसो गवस, जयराम परमेकर, रुपेश गवस, दत्तप्रसाद बांदेकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

बीएसएनएल टॉवर तत्काळ कार्यान्वित करण्यात यावा

विर्डी येथील बीएसएनएल टॉवर उभारून आता दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, शेतकऱ्यांचे व्यवहार आणि दैनंदिन संपर्क व्यवस्था कोलमडली आहे. तातडीच्या प्रसंगी संपर्क साधता येत नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही सेवा सुरू करण्यात आलेली नसल्याने संताप वाढत आहे. त्यामुळे हा उभारलेला टॉवर देखील तत्काळ कार्यान्वित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. दरम्यान बीएसएनएलचे अधिकारी उपोषण स्थळी दाखल होत येत्या 3 एप्रिल रोजी उभारलेल्या टॉवर कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासनपर पत्र दिल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे.