
सावंतवाडी: केरवडे-कुडाळ मार्गे बेकायदेशीरपणे आणि क्रूरपणे गोवंश वाहतूक करण्याचा प्रयत्न सावंतवाडी पोलिसांनी कोलगाव येथे हाणून पाडला. याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालकासह एका ६४ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच ०४ ईसी ७६८३ या क्रमांकाच्या बोलेरो मॅक्सि वाहनातून रघुनाथ जाधव (वय ६४, रा. भुदरगड, जि. कोल्हापूर) आणि चालक सागर गुरव (रा. भुदरगड, जि. कोल्हापूर) हे दोघे दोन गायी आणि त्यांची अवघी सात दिवसांची दोन वासरे यांची कोणतीही परवानगी नसताना वाहतूक करत होते. पोलिसांनी कोलगाव येथे वाहनाची तपासणी केली असता, ही वाहतूक केरवडे-कुडाळ मार्गे भुदरगड (कोल्हापूर) येथे जात असल्याचे आढळले. जनावरांची वाहतूक करताना 'प्राण्यांना निर्दयतेने वागविणे' या कायद्याचे उल्लंघन झाल्याचे आणि कोणत्याही प्रकारचा आवश्यक परवाना नसल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी, सावंतवाडी पोलिसांनी रघुनाथ जाधव आणि चालक सागर गुरव यांच्याविरुद्ध 'प्राण्यांना निर्दयतेने वागविणे' आणि विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी गोवंश वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो मॅक्सि वाहन जप्त केले आहे. तसेच, जप्त करण्यात आलेल्या दोन गायी आणि दोन वासरांची पुढील काळजी घेण्यासाठी त्यांना जवळच्या गोशाळेत सोडण्यात आले आहे. या कारवाईनंतर गो-रक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीदेखील सावंतवाडी पोलिस ठाण्यात हजेरी लावली होती, जेणेकरून गोवंश तस्करांचे धाडस वाढणार नाही.










