
सावंतवाडी : माशेल-गोवा येथील सम्राट क्लबचा स्वर-दरबार-तराणे सरगम गीतांचा शाही सोहळा सावंतवाडीच्या राजवाड्यात पार पडला. गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडू येथील रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला मिळतं असून सम्राट क्लबचा वारसा आता खऱ्या अर्थाने गाजत आहे. सावंतवाडीच्या राजघराण्याच्या उपस्थितीत दरबार हॉलमध्ये ही संगीत मैफील रंगली होती.
सावंतवाडी संस्थान पूर्वीपासून कलाप्रेमी संस्थान हिंदुस्थानात प्रसिद्ध आहे. हाच वारसा खऱ्या नव्या पिढीने जपला आहे. राजघराण शास्त्रीय संगीत तसेच भारतीय कला यांना राजाश्रय देत आहे. सम्राट क्लबचा वारसा सावंतवाडी राजप्रासादात भव्यदिव्य स्वरुपात साजरा झाला. गौरवशाली परंपरा लाभलेल्या या कार्यक्रमाची संकल्पना गोव्यातील प्रसिद्ध गायिका सम्राट प्रचलाताई आमोणकर यांची होती. सम्राट क्लबने सलग ४० शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम गोवा, तामिळनाडू, महाराष्ट्रात सादर करून रसिकांची वाहवा मिळविली आहे. सावंतवाडीत होणारी ४१ वी मैफिल खास ठरली. सावंतवाडीच्या भव्य राजवाड्यात शास्त्रीय गायन आणि तबला यांची अनोखी जुगलबंदी रंगली होती. या कार्यक्रमाला सावंतवाडी संस्थानचे खेमसावंत भोसले, शुभदादेवी भोसले, लखम सावंत-भोसले, श्रद्धा सावंत-भोसले, सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट १ चे अध्यक्ष सम्राट प्रवीण सबनीस आदी उपस्थित होते.
सावंतवाडीच्या राजवाड्यात कला सादर करण्याची संधी गोव्यातील उदयोन्मुख कलाकारांना मिळाली. शास्त्रीय गायनाची जुगलबंदी विदुषी प्रचलताई आमोणकर यांच्या शिष्यांनी केली. गोव्यातील प्रतिभावंत नवोदित गायिका मैथिली चारी, शरण्या पिसुर्लेकर, शुभ्रा नाईक, रोहिणी वझे, सौ. गीता श्रुती गजानन वझे, कृतिका गावस यांनी ४१ व्या वारसा मैफिलीची रंगत वाढविली. तबल्याची जुगलबंदी गोव्यातील नामवंत तबला वादक अमित प्रतापराव भोसले व त्यांचे शिष्यांनी सादर केली. गोवा संगीत महाविद्यालय, कला अकॅडमी काणकोण, केपे येथील केंद्रात भोसलेंनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. आकाशवाणी, दूरदर्शनचे ते उच्चश्रेणीचे कलाकार आहेत. हार्मोनियम साथ आकाश जल्मी, अक्षय गावडे, तबलासाथ मिलिंद परब यांनी केली. यावेळी सम्राट क्लबचे अध्यक्ष मंगेश गावकर, कार्यक्रम निर्मात्या, संचालिका प्रचलताई आमोणकर आदींसह रसिक श्रोते उपस्थित होते.