
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि त्यांच्या सीमा निश्चित करणारी प्रारूप अधिसूचना मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार, नगरपरिषदेमध्ये एकूण २० सदस्य असतील आणि त्यासाठी १० द्विसदस्यीय प्रभाग तयार करण्यात आलेत. मागीलवेळी १७ सदस्य होते, त्याची संख्या आता २० झाली आहे. तर ८ प्रभागात २ अधिक प्रभागांची भर पडली असून एकूण प्रभागांची संख्या १० झाली आहे. त्यामुळे आता सावंतवाडी शहराच्या राजकारणात अधिक रंगत येणार असून इच्छुकांची संख्या देखील वाढणार आहे.
प्रभाग क्रमांक १ मध्ये गोविंद चित्र मंदिर, चंदातळी, वि. स. खांडेकर हायस्कूल, वेद पाठशाळा, शिकेरा अवाट आणि बुराणगल्ली आदी भागांचा समावेश असून एकूण लोकसंख्या २४५५ आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये बाहेरचा वाडा, भटवाडी, बोर्जीसवाडा, नागवेकर अवाट, लाखे वस्ती आणि जिमखाना परिसर, धनश्री मंगल कार्यालय या भागांचा समावेश असून एकूण लोकसंख्या २४१२ एवढी आहे. तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये वैश्यवाडा मारुती मंदिर, रघुनाथ मार्केट, बस स्थानक, चितार आळी आणि प्रांत ऑफिस यांसारख्या मध्यवर्ती भागांचा समावेश असून या प्रभागाची लोकसंख्या २३५२ एवढी आहे. तसेच प्रभाग क्रमांक ४ मध्ये झिरंग, म्हाडा कॉलनी, कावले अवाट, गुलमोहर कॉलनी, दत्तनगर कॉलनी, उर्दू हायस्कूल आणि आयटीआय परिसराचा समावेश असुन या प्रभागाची लोकसंख्या २५९४ आहे. प्रभाग क्रमांक ५ हा आत्मेश्वर मंदिर, जुना बाजार, भिसे उद्यान, शाळा क्र. २ आणि कादरी मशीद या भागांचा समावेश असून एकूण लोकसंख्या २५५६ आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ६ मध्ये राणी पार्वतीदेवी हायस्कूल, नगरपरिषद कार्यालय, विठ्ठल मंदिर, गणपती मंदिर, होळी खुंट, कामत नगर आणि मच्छी मार्केटचा समावेश असून या प्रभागाची लोकसंख्या २१७७ एवढी आहे. प्रभाग ७ मध्ये राजवाडा, उप जिल्हा रुग्णालय, सिंधीवाडा, हेल्थपार्क, शिल्पग्राम, खासकील वाडा आणि आयुर्वेदिक कॉलेज या भागांचा समावेश आहे. या प्रभागाची लोकसंख्या २२३० एवढी आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये वनविभाग कार्यालय, मिलाग्रीस हायस्कूल, शिव उद्यान, जुने कोर्ट, पंचम खेमराज महाविद्यालय आणि सालईवाडा या भागांचा समावेश असून या प्रभागाची लोकसंख्या २३४३ एवढी आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ९ हा तहसीलदार कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, सर्वोदय नगर, मोरडोंगरी परिसर, गणेश नगर आणि बांदेकर कॉलेज असा असून या प्रभागाची लोकसंख्या २३८० आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये जिल्हा कारागृह, आंबेडकर उद्यान, पोलीस लाईन, गरड पाटणकर अवाट, नवसरणी इमारत आणि तेली अवाट, ज्युस्तिनगर या भागांचा समावेश आहे. या प्रभागाची लोकसंख्या २३५२ एवढी आहे. या प्रारूप अधिसूचनेवर नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास त्या ३१ ऑगस्ट २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी लेखी स्वरूपात मुख्याधिकारी, सावंतवाडी नगरपरिषद यांच्याकडे सादर करायच्या असून या तारखेनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मराठी आणि इंग्रजी अधिसूचनेतील वर्णनात काही तफावत आढळल्यास, नकाशातील सीमांना अंतिम मानले जाईल. प्रभागांच्या सीमा दर्शवणारे नकाशे नगरपरिषद कार्यालयात कामकाजाच्या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत अशी माहिती मुख्याधिकारी यांनी दिली आहे.