काय घडलं सावंतवाडीच्या सभागृहात ?

Edited by: विनायक गांवस
Published on: February 24, 2026 15:48 PM
views 80  views

सावंतवाडी : ५७ कोटींच्या नळपाणी योजनेसाठी माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या अभिनंदनाचा ठराव आपण घेतला. पण, प्रशासनाकडून तज्ञ हे काम बघत नसून बांधकाम विभाग बघत असल्याचा आरोप करत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब यांनी आक्रमक पवित्रा घेत यावर आक्षेप घेतला. तज्ञाची नेमणूक या कामी करावी अशी मागणी श्री. परब यांनी केली. यावर प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नगरपरिषदेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त असेल अशी ग्वाही दिली. तसेच पाणी पुरवठा, भुयारी गटार ही योजना, पाळणेकोंड धरणातील गाळ काढण्यासाठी लवकरच पाठपुरावा करणार असून भटक्या कुत्र्यांबाबत त्वरित धोरण स्वीकारले जाईल असे सांगितले. नगरपरिषदेची पहिलीच सर्वसाधारण सभा लोकमान्य टिळक सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. 

प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.‌ यावेळी श्री. निरवडेकर यांनी नगरसेवकांच्या सुचना ऐकून घेत मागण्यांवरही सकारात्मक प्रतिसाद दिला. सुरूवातीला सुट्टीवर असलेल्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असल्याने विरोधी नगरसेवक संजू परब यांनी आक्षेप घेतला. सभागृह एकाच नगराध्यक्षांनी चालवाव अशी मागणी त्यांनी केली. यानंतर प्रभारी नगराध्यक्ष ॲड. निरवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यात मच्छी मार्केट पाणी पुरवठा, शहरात होणाऱ्या कचऱ्यासह विविध प्रश्नांवर त्यांनी तात्काळ कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. भटक्या कुत्र्यांचा होणारा उपद्रव व काल झालेल्या जखमी मुलांची भेट घेतल्यानंतर तात्काळ यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर, माजी नगराध्यक्ष नगरसेवक संजू परब, सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगावकर, नगरसेवक खेमराज उर्फ बाबु कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, ॲड निता सावंत-कविटकर, ॲड सायली दुभाषी, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, तौकिर शेख, देवा टेमकर, निलम नाईक, वीणा जाधव, दिपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, शर्वरी धारगळकर, सुकन्या टोपले, स्नेहा नाईक, सुनिता पेडणेकर आदींसह नगरसेवक नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.

श्री. संजू परब यांनी ५७ कोटीच सुरू असणार २० टक्के काम योग्य झालंय का ? बांधकामच्या अधिकाऱ्यांना हे काम जमणार का ? त्यामुळे तातडीने मुख्याधिकारी यांनी याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली. ५७ कोटी खर्च करून घरोघरी पाणी पुरवठा योग्य पद्धतीने न झाल्यास त्याचा उपयोग काय ? असा सवाल त्यांनी केला. यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर यांनी देखील निवृत्त पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच मार्गदर्शन यात घेण्याची सुचना केली.‌तसेच श्री. परब यांनी पाणी पुरवठा विभागात आणखीन दोन कर्मचारी वाढविण्याची मागणी केली. येथील इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांना ५ वर्षांची भाडी भरावी लागणार आहेत. मी आठवण केल्यावर स्मरण पत्र प्रशासनान पाठवलं. ४ वर्ष प्रशासन झोपून होत. त्यामुळे या गाळे मालकांना हे पैसे भरण्यासाठी मुदत द्यावी अथवा हाप्ते स्वरूपात हे पैसे भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली. 

नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या निधीतून नगरपरिषदेला दिलेली रूग्णवाहिका कुठे आहे ? कोणत्या संस्थेकडे ती दिली आहे ? तीच पुढे काय झालंय याची माहिती मिळाली अशी मागणी केली. तसेच कचरा टाकला जातो अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह, चिवार टेकडी व कचरा व्यवस्थापन ठिकाणच सडणार सामान स्क्रॅप करावं अशीही मागणी केली. पाणी पुरवठा सभापती प्रतिक बांदेकर यांनी मच्छी मार्केट येथील विहीर ही नगरपरिषदेची नसून खाजगी मालकीची असल्याचे सांगत संबंधितांकडून मार्केटला पाणी वापरण्यास मज्जाव केला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. याला नगरसेवक श्री. सुर्याजी यांनी दुजोरा देत मच्छी विक्रेत्यांना पाण्याची सोय करून देण्यात यावी तसेच मंजूर झालेली बोअरवेल खोदण्यासाठी परवानगी द्यावी अशी सुचना केली. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी देखील संबंधित विहीर खाजगी मालकीची नसून ती नगरपरिषदेच्या मालकीची आहे असे सांगत सभापती श्री. बांदेकर यांना समर्थन केले.  

भटक्या कुत्र्यांची गंभीर दखल !

या बैठकीत भटक्या कुत्र्यांच्या विषय गाजला. कालच चिमुकल्या मुलांवर कुत्र्याने हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर नगरसेवक तौकिर शेख, देवा टेमकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालणाऱ्या महिलेकडून न.प. अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचे सांगत संबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण लसीकरण करण्याकामीचा प्रस्ताव सभापती प्रतिक बांदेकर यांनी वाचला. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरसेवक श्री. शेख व श्री. टेमकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी नगरसेवक देव्या सुर्याजी, अजय गोंदावळे, ॲड. निता सावंत-कविटकर व सभापती आनंद नेवगी यांनीही सार्वजनिक ठिकाणी खायला घालणाऱ्यांवर निर्बंध आणावे अशी मागणी केली. प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आपण कार्यवाही करत आहोत. काल जखमी झालेल्या मुलांची भेट आपण घेतली असून भटके कुत्रे व सार्वजनिक ठिकाणी खायला घालणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती श्री. निरवडेकर यांनी दिली.

तसेच सावंतवाडी शहराच्या मोती तलावाच्या काठावर बसवण्यात आलेल्या कचराकुंड्यामुळे मोती तलावाच्या फुटपाथवर अस्वच्छता पसरते. याकडे नगरसेविका ॲड. सायली दुभाषी यांनी लक्ष वेधले. कचराकुंड्याना लॉक सिस्टिम तसेच उंची वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करून यावर मार्ग काढण्यात येईल असे श्री. निरवडेकर यांनी सांगितले. मोती तलावाच्या फुटपाथवर नगरपरिषदेच्या समोर असलेल्या झाडामुळे फुटपाथ खचतो. परिणामिती झाडे काढण्यात यावी याबाबत चर्चा झाली. मात्र, झाडामुळे त्या ठिकाणी अनेकांना सावलीची सोय होते. हे विचारात घेता झाडे काढताना तेथे वेगळी सावली व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी श्री. परब यांनी केली.‌ तर यावर विचार केला जाईल आणि नंतरच निर्णय घेऊ असे प्रभारी नगराध्यक्ष श्री. निरवडेकर यांनी सांगितले. जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यासंदर्भात चर्चा झाली. आपण नगराध्यक्ष असताना या संदर्भात निर्णय घेतला होता. या कामाच्या चौथऱ्यासाठी निधीची तरतूदही झाली होती. कामाला मंजुरी मिळाली होती. परंतु, नंतर हे काम का होऊ शकले नाही ? त्या कामाचे काय झाले ? याची माहिती प्रशासनाने आपल्याला द्यावी अशी मागणी नगरसेवक श्री. परब यांनी केली. शहरातील मंगळवारच्या आठवडा बाजारातील व्यापारांसाठी विशेषता महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था करण्यासंदर्भात झालेल्या चर्चेत निर्णय घेण्यात आला. शहरामध्ये बऱ्याच इमारती या जीर्ण आणि धोकादायक झाले असून संबंधित इमारतीच्या मालकांना तसेच घर मालकांना नोटिसा देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या संदर्भात सभागृहात विषय ठेवण्यात आला. या इमारती धारकांवर कलम 331 अन्वये कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी ॲड. निता कविटकर यांनी केली. 57 कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या कामाच्या मंजुरीसाठी स्थानिक आमदार दीपक केसरकर तथा तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या सहकार्याबद्दल नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी अभिनंदनचा ठराव मांडला. त्याला संजू परब यांनी अनुमोदन दिले. शहरातील उद्यानशेजारी कायमस्वरूपी रंगमंच उभारण्याबाबत सभागृहात चर्चा झाली. उद्यान सभापती मोहिनी मडगावकर यांनी हा विषय मांडला. त्याला नगरसेवक अजय गोंदावळे यांनी विरोध दर्शवला. कायमस्वरूपी हा रंगमंच नको असे सुचित करत गोंदावळे यांची बाजु संजू परब यांनी लावून धरली. या विषयावर प्रभारी नगराध्यक्ष श्री. निरवडेकर यांनी चर्चे अंती निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. या सभेला काही मुद्द्यावरून सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधी नगरसेवकांमध्ये तू-तू, मै-मै झाली. ॲड. दुभाषी व मोहीनी मडगावकर यांच्यातही शाब्दिक चकमक उडाली. मात्र, प्रभारी नगराध्यक्ष ॲड निरवडेकर यांनी सर्व विषय व्यवस्थित रित्या हाताळत ही सभा यशस्वीरित्या पार पडली.

सभागृहाबाहेर सत्ताधारी नगरसेवकांत ''तू-तू मैं-मैं''

 ४८ ठरावांना यावेळी सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी सुचना मागण्यांसह मंजूरी दिली. मात्र, सभा संपताच सत्ताधारी नगरसेवकांत 'तू-तू - मैं-मैं' झाल्याची जोरदार चर्चा नगरपरिषदेत सुरू आहे. पालिकेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा पार पडली. मात्र, ही बैठक संपताच सत्ताधारी नगरसेवकांत तू-तू - मैं-मैं झाल्याची जोरदार चर्चा सध्या नगरपरिषदेत सुरू आहे. नगरसेवकांत आपापसातच हा भडका उडाल्याची माहिती मिळत आहे. अखेर उपस्थितांनी या वादावर पडदा टाकल्याचे समजत असून नेमकं वादाच कारण समजू शकलेले नाही. मात्र, सभागृहा बाहेरील या तू-तू-मैं-मैं ची जोरदार चर्चा सुरू आहे.