
देवगड : श्री.स.ह. केळकर महाविद्यालयाच्या समाज समूह सहभाग कार्यक्रमाअंतर्गत वंचित आणि निराधार घटकांसाठी कार्य करणाऱ्या जीवन आनंद संस्था यांच्या वतीने देवगड महाविद्यालयात विशेष जनजागृती कार्यक्रम घेऊन मदतीचे आवाहन करण्यात आले.या कार्यक्रमाला विद्यार्थी,प्राध्यापक व कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. श्रीकांत सिरसाठे यांनी आपल्या मनोगतातून अशा प्रकारचे समाजाभिमुख कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. “शिक्षणासोबतच समाजाप्रती असलेली बांधिलकी जपणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.यानंतर जीवन आनंद संस्थेचे संस्थापक मा. संदीप परब यांनी संस्थेची उद्दिष्ट्ये, कार्यपद्धती व समाजातील गरजू, निराधार, अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शिक्षण, आरोग्य, अन्न व निवारा या मूलभूत गरजांसाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.जीवन आनंद संस्थे अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या नऊ आश्रमांची व आश्रमांमध्ये निराधार बांधवांची कशाप्रकारे देखभाल केली जाते याबद्दल सचित्र माहिती दिली.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देत,गरजू बांधवांसाठी आर्थिक तसेच वस्तूरूपाने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवत मदत करण्याची तयारी दर्शविली. काही विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून संस्थेच्या पुढील उपक्रमांत सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली.सन 2018 मध्ये महाविद्यालयातील इतिहास विभागाने प्रा.श्रीकांत सिरसाठेसरांच्यामार्गदर्शनाखाली संविता आश्रम कुडाळ या ठिकाणी सहलीचे आयोजन करून विद्यार्थ्यामार्फत गरजू साहित्य आश्रमास दिले होते. या सहलीतील विद्यार्थिनी कु. सोनाली कुलकर्णी हि 2018 पासून ते आज पर्यंत संविता आश्रमला आपल्या परीने सर्वतोपरी मदत करीत आहे. असावसाआजच्यामहाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जोपासवा असे आवाहन करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात श्री. शां. कृ.पंतवालावलकर अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र मुंबरकर यांनी अशा उपक्रमांना मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.सुहास खरात यांनी मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रल्हाद कांबळे यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना दृढ झाली असून वंचित व निराधार घटकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याची प्रेरणा मिळाली आहे.










