सावंतवाडी नगरपरिषदेकडून थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई

Edited by:
Published on: March 08, 2025 19:55 PM
views 131  views

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या कर विभागाकडून मालमत्ता थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर व प्रशासकिय अधिकारी तथा कार्यालयीन अधिक्षक वैभवकुमार अंधारे, कर निरिक्षक श्रीम. प्राची पाटील यांच्या जप्ती पथका‌द्वारे सावंतवाडी शहरातील 4 मालमत्ता सील करण्यात आलेल्या आहेत. सावंतवाडी शहरात निवासी, बिगर निवासी, मिश्र व औदयोगिक अशा एकूण 11857 नोंदणीकृत मालमत्ता आहेत. सावंतवाडी नगरपरिषदेकडून वारंवार आवाहन करुन देखील कर न भरणा-या थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.

1 मार्च पासून पुढील कालावधीत ज्या मालमत्ताधारकांचा मालमत्ता कर थकीत आहे अशा मालमत्ता 31 मार्चपर्यंत सील करण्यात येणार असून शहरातील मालमत्ताधारकांना मागणी बिले यापूर्वीच वाटप केलेली असल्याने कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाणीप‌ट्टी न भरणा-यांची नळ कनेक्शन तोडण्यात आलेली आहेत.सावंतवाडी शहरातील नागरीकांच्या सोयीसाठी  31 मार्च 2025 पर्यंत या मोहीमेअंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेचे नागरी सुविधा केंद्र कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी कर भरणा करण्याकरीता सुरु ठेवण्यात येणार असून सावंतवाडी शहरातील थकीत पाणीपट्टी तात्काळ भरणा करून नळतोडणीची कारवाई टाळावी तसेच थकीत मालमत्ता कर भरणा करुन मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी पारितोष कंकाळ यांनी केले आहे.