
सावंतवाडी : कोकणवासियांचा उत्सव म्हणून ज्या उतसवाकडे पाहिलं जातं तो गणेशोत्सव. घराघरात आपल्या लाडक्या मंगलमूर्तीचे स्वागत करण्यासाठी तयारीची लगबग अंतिम टप्प्यात आली आहे. गणेश चित्रशाळाही गजबजून गेल्या आहेत. महागाईमुळे सर्वच वस्तूंच्या दरात वाढ झाली असली तरी 'कोकणचा हा सण मोठा, महागाईचा नाही तोटा' म्हणत गणेशभक्त मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करत आहे. राज्य महोत्सव असा दर्जा या उत्सवाला मिळाल्याने सर्वत्र चैतन्याचे वातावरण असून सावंतवाडीच्या बाजारपेठा गजबजल्या आहेत.
रंगांच्या किमतीत वाढ झाल्याने यंदा गणेश मूर्तींचे दरही वाढले आहेत. तर वाद्यांच्या किमतीतही वाढ झाली आहे. मात्र, गणेशभक्तांच्या उत्साहात कोणती कमी राहीलेली नाही. मुंबई, पुणे यासह परदेशात राहणारा चाकरमानी गणेशोत्सवाला कोकणात दाखल झाला आहे. रेल्वे, बस, विमान, खासगी गाड्यांनी ते दाखल झालेत. सोशलमीडियावर सुद्धा गणेश चतुर्थीच्या रिल्सनी धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. सर्वत्र घराची साफसफाई, रंगरगोटी, डेकोरेशन काम पूर्ण झाली असून चतुर्थीची खरेदी करण्यात सारेजण मग्न आहेत. इको फ्रेंडली गणेशोत्सवावर अधिक भर असून मकर, गणेश सजावट साहित्य, आकर्षक लाईट्स, बाजारात खरेदी करण्यासाठी ग्राहक दाखल झाल्याने बाजारपेठा फुलल्या आहेत. अनेक ठिकाणी थर्माकोलला पर्यायी अशी कागदी मकर विक्रीस उपलब्ध आहेत. घराघरात बाप्पाची प्रतिष्ठापणा होणार असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. किराणा मालाच्या दुकानात महिलांनी मोठी गर्दी केली आहे. महागाई वाढत असली गणेश मूर्तीची किमती वाढली, गृहपयोगी वस्तू महागल्या मात्र तरीही कोकणवासीयांचा आनंद अन् उत्साह महागाईच्या डबल झाला आहे. हा सण उत्साहात साजरा करताना प्रत्येकजण दिसत आहे.
गणेशोत्सवास मोठ्या प्रमाणात सावंतवाडी बाजारपेठेत गर्दी असते. त्यात बांदा, तळवडे बाजारपेठा झाल्यानं थोडा भार कमी झाला आहे. शहरातील रस्ते अरुंद आहेत. पार्किंगची सोय नाही त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतूक पोलीसांची डोकेदुखी वाढली आहे. गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात चाकरमानी आले असून दुचाकी, चारचाकी, तसेच मुंबई, पुण्यावरून मोठ्या प्रमाणात बसेस यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. बाजारपेठेत भाजी, फळ विक्रेते, माटी सामान दाखल झाले आहे. बच्चेकंपनीसाठी खास फटाके बाजारात आले आहेत. सुगंधीत अगरबत्ती, धूप, लडी, फुलांच्या माळा आदींची दुकान सजली आहे. आरती, भजन संग्रह छापले गेलेत. मिठाईच्या दुकानात गर्दी असून मोदकाचे विविध प्रकार पहायला मिळत आहेत. बॅनर प्रिंटीगही मोठ्या प्रमाणात होत असून चौकाचौकात शुभेच्छा बॅनर लागले आहेत. हार, फुलांच्या किंमतीत वाढ झाली आहे. नगरपरिषद, पोलिस प्रशासन यांच्या वतीने वाहतूक आणि बाजारपेठ नियोजन केलं गेलं. त्याचा फायदाही झाला. पावसाचा लपंडाव सुरू असून पाऊस असो वा नसो विजेचा लपंडाव मात्र सुरु आहे. त्यामुळे महावितरण विरोधात तीव्र संताप गणेशभक्तांत आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीत विज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान विज वितरण समोर आहे. मुख्य रस्त्यांवर पोलीस, होमगार्ड तैनात असून निर्विघ्नपणे हा उत्सव साजरा करण्यासाठी विघ्नहर्त्याला साकडं घातलं आहे.