
सावंतवाडी : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर २८ फेब्रुवारीला भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे महासंमेलन सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे. यात निवडणूक कशा पद्धतीने लढण्यात यावी याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तर गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत. ४ हजार बुथ प्रमूख कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकार सावंत यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले, नुकतीच दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजविण्यात आले आहे. दोन वर्षांपासून आम्ही त्यासाठी तयारी केली असून आता अंतिम टप्प्यात जोमाने कामाला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. काही झाले तरी आम्ही कमळ या चिन्हावरच लोकसभा लढणार आहोत. त्या दृष्टीने आता अंतिम टप्प्यातील तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत २८ फेब्रुवारीला राणी पार्वती देवी हायस्कुलच्या सभागृहात हे महासंमेलन होणार आहे. यावेळी सर्व शक्तीकेंद्र प्रमुख महिला, युवा प्रमुख, संघटनात्मक पदाधिकारी असे मिळून तब्बल ४ हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकसभा लढविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. या मेळाव्याची जबाबदारी बाळासाहेब पाटील, अतुल काळसेकर, विक्रम पाटील आणि प्रमोद जठार यांच्याकडे देण्यात आली आहे संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी मधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. मावळ, रायगड आणि सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा तीन लोकसभा मतदार संघात ही संमेलन घेण्यात येणार आहे. याचा निवडणूकीच्या दृष्टीने फायदा होणार आहे. यात भाजपचे माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली सहभागी होणार आहेत. यांसह महेश सारंग, संजू परब, मनोज नाईक यांनी या संमेलनासाठी जोरदार तयारी केली आहे अस मत प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग, माजी नगराध्यक्ष संजू परब, अमित परब, राजन राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.
लोकसभेच्या रिंगणात राणे उतरत आहेत हे लक्षात आल्यानंतर खासदार विनायक राऊत घाबरले आहेत. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होवून त्यांच्या विरोधात विधाने करीत सुटले आहेत असा पलटवार भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केला. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आमची मोठी ताकद आहे. त्यामुळे दोन आमदारांच्या जीवावर राऊत निवडून येणार नाहीत. शेखर निकम, किरण सामंत यांची ताकद आमच्यासोबत आहे. सिंधुदुर्गात आमची ताकद आहे. त्यामुळे राऊतच घाबरले आहेत. या ठिकाणी भाजपा लोकसभा निवडणूक लढणार आहे. कोण उमेदवार याचा निर्णय वरिष्ठ घेणार आहेत. परंतु, नारायण राणेंचे नाव चर्चेत आहे. त्यामुळे आता राणेंपुढे आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात आल्यामुळेच विनायक राऊत घाबरले आहेत अस विधान प्रभाकर सावंत यांनी केलं