
सावंतवाडी : सावंतवाडीच्या संस्थानकालीन कारागृहाची सुरक्षा आता पुन्हा एकदा वाढविण्यात येत आहे. त्यासाठी कारागृहाची भिंत एक मीटरने उंच उभारण्यात येणार आहे तसेच त्या ठिकाणी सोलर फेन्सिंगसुद्धा उभारले जाणार आहे. जिल्हा नियोजनच्या निधीमधून तब्बल ३५ लाख रुपयांचा निधी याकरीता मंजूर करण्यात आला आहे. याचा फायदा कारागृहाची सुरक्षा वाढण्यासाठी होणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता वैभव सगरे यांनी देत या वृत्तास दुजोरा दिला आहे.
पैशाची वाहतूक करणारी गाडी उडवून देण्याचा उद्देशाने संशयित ज्ञानेश्वर लोकरे व त्यांच्या अन्य सहा साथीदारांनी नांगरतास येथे रस्त्यावर ट्रक उभा करून त्याच्या खाली पैसे वाहतूक करणारी गाडी उडवण्यासाठी बॉम्ब लावला होता. परंतु, तत्पूर्वीच त्याठिकाणी उभा असलेला ट्रक पाहण्यासाठी काही स्थानिक तरूण गेले असता त्याचवेळी हा बॉम्बस्फोट झाला. त्यात तीघे जण गंभीर जखमी झाले होते तर उपचारादरम्यान दोन युवकांचे निधन झाले होते. ही घटना २००७ ला घडली होती. त्याप्रकरणी लोकरे याच्यासह सहा जणांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शिक्षा भोगत असताना लोकरे याने सावंतवाडी कारागृहाची उंच भिंत ओलांडून पळ काढला होता. त्यामुळे हे कारागृह चर्चेत आले होते. तो लोकरे अद्यापही फरार आहे. त्यानंतर कारागृहाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल होत. त्या ठिकाणी तात्पुरते सोलर फेंसिंग उभारून या प्रश्नावर पडदा टाकण्यात आला होता.
सद्यस्थितीत या ठिकाणी ४० ते ५० जण बंदीवान शिक्षा भोगत आहे. तर अन्य २० हून अधिक जण न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्या ठिकाणी आणले जातात. त्यामुळे या सगळ्या बंदीवानांची सुरक्षा लक्षात घेता तसेच त्यांच्याकडून पुन्हा पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न होवू नये यासाठी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून या कारागृहाच्या सुरक्षेसाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीच्या माध्यमातून कारागृहाच्या बाजूला असलेल्या भिंती एक मीटरने उंच करण्यात येणार आहे. तर अन्य ठिकाणी काही मजबुती करण्याची कामे केली जाणार आहे असे बांधकाम अधिकारी श्री. सगरे यांनी सांगितले.