सावंतवाडी सहकारी पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध...!

Edited by: विनायक गावस
Published on: February 14, 2024 10:46 AM
views 268  views

सावंतवाडी : सावंतवाडी सहकारी पतपेढीची निवडणूक अखेर बिनविरोध झाली. पक्षीय राजकारण सहकारात न आणल्यामुळे अखेर समझोता होऊन विद्यमान पॅनेलच कायम ठेवण्यात आले. एका जागेसाठी निर्माण झालेला पेच अखेर मिटविण्यात आला. त्याचे श्रेय सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष  संजू परब व उमेदवार गजानन सावंत यांना जाते. विद्यमान संचालकांपैकी अॅड. गोविंद बांदेकर, रमेश बोंद्रे, उमाकांत वारंग, दत्ताराम सावंत, शरद सावंत, चंद्रकांत शिरोडकर, देवेंद्र तुळसकर, यल्लापा नाईक, सदानंद जाधव, सौ. सीमा मठकर, सौ. मनिषा मिशाळ, सौ. किशोरी कुडतरकर, श्रीमती वैष्णवी बांदेकर यांची नव्याने निवड करण्यात आली आहे.

सावंतवाडी सहकारी पतपेढीची स्थापना सावंतवाडी संस्थानच्या कारकिर्दीत तत्कालीन नृपती पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या प्रेरणेने ३० जुलै १९३२ रोजी झाली. प्रारंभी ही संस्था सावंतवाडी संस्थानातील सेवकांची अर्थात नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी म्हणून स्थापन करण्यात आली होती. या सोसायटीचे अर्थात संस्थेचे पहिले अध्यक्ष सावंतवाडी संस्थानचे त्यावेळचे दिवाण कै. व्ही. बी. चंद्रचूड हे होते. सध्या भारत सरकारचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश डी. वाय. चंद्रचूड यांचे ते आजोबा होत. १९४७ मध्ये संस्थान विलिन झाल्याने १९५० साली या संस्थेचे सावंतवाडी सहकारी पतसंस्थेत रुपांतर झाले.

सन १९८४ पासून या संस्थेची निवडणूक होत आहे. जवळ जवळ ४० वर्षांनी या संस्थेची प्रथमचं निवडणूक बिनविरोध झाली. महिलांना जास्तीत जास्त जागा मिळाव्यात या हेतूने आम्ही आमचे धोरण बदलून संस्थेमध्ये चार जागा या महिलांसाठी उपलब्ध करुन दिल्या. सावंतवाडी संस्थेच्या कारभारावर सर्व सभासदांचा, ठेवीदारांचा आमच्यावर विश्वास असल्याचे दिसून येते असा दावा संस्थेचे चेअरमन अॅड. गोविंद बांदेकर व माजी चेअरमन रमेश बोंद्रे यांनी केले. तर संस्थेच्या चेअरमन, व्हाईस चेअरमनची निवड गुरुवार १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी आर. आर. आरावंदेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.