
सावंतवाडी : सहकारी पतपेढी मर्यादित, सावंतवाडी या संस्थेच्या सभासदांची ९१वी अधिमंडळ वार्षिक बैठक शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी श्रीराम वाचन मंदिर सभागृह सावंतवाडी येथे संस्था अध्यक्ष अॅड.गोविंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. अध्यक्षांनी उपस्थितांचे स्वागत करून अहवाल सालात नैसर्गिक आपत्तीत दिवंगत झालेले नागरिक, मान्यवर, हितचिंतक, सभासद तसेच नागरिक यांना श्रद्धांजली वाहिली.
सभा कामकाजात आर्थिक पत्रके व अहवालावर चर्चा होऊन आर्थिक पत्रके मंजूर करण्यात आली. सभेत सुमारे ७५ सभासदांनी सहभाग घेतला. संस्था सतत नफ्यात असून यावर्षीही 'अ' वर्ग कायम राखला. तसेच यावर्षी संस्थेस १५ लाखांचे वर नफा झाला असून १७ कोटी ठेवींचे उद्दिष्ट पार केले व सभासदांना ७ टक्के दराने लाभांश जाहीर करून नफा विभागणीस मंजूरी देण्यात आली. त्याबद्दल उपस्थित सभासदांनी संस्था चालकांचे व खास करून अध्यक्षांचे कौतुक केले व सभेने विषय पत्रिकेनुसार सर्व ठराव एकमताने मंजूर केले. सभा कामकाजात सभासदांच्या शंकांचे अध्यक्ष, व्यवस्थापक व ज्येष्ठ संचालक रमेश बोंद्रे यांनी निरसन केले. सभेमध्ये रमेश पई, नरेंद्र देशपांडे, राजू बेग, बाळासाहेब बोर्डेकर वगैरे सभासदांनी सहभाग घेतला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री. नरेंद्र मसुरकर यांच्या हस्ते सभासदांच्या पाल्यांपैकी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यात इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक हिमानी श्रीराम धोंड, इयत्ता बारावीमध्ये प्रथम क्रमांक कार्तिकी प्रथमेश विरनोडकर, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत मृण्मय चंद्रकांत शिरोडकर, विभव राऊळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नरेंद्र मसुरकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सभेस सर्व संचालक, कर्मचारी, पिग्मी एजंट, सभासद, सभासद प्रसाद पावसकर, अॅड. विरेश राऊळ, तुषार वेंगुर्लेकर, कीर्ती बोंद्रे, सखी पवार आदी उपस्थित होते. संचालक रमेश बोंद्रे यांनी समारोपपर भाषण करून सभा कामकाज संपल्याचे घोषित केले.