
सावंतवाडी : तळकोकणातील बहुचर्चित सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच चित्र महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या अधिकृत घोषणेनंतर स्पष्ट झाले आहे. मात्र, दोन्हीकडे बंडखोरी अटळ असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
महायुतीतून शिवसेनेकडून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते चौथ्यांदा इथून निवडणूक लढणार आहेत. युतीतील घटक पक्ष भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब मात्र अपक्ष लढण्याची शक्यता आहे. महायुतीच्या पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला ते अनुपस्थित राहील्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. राणेंपासुन दुर गेलेल्या विशाल परब यांची समजूत काढण्यात भाजप कितपत यशस्वी होतय हा प्रश्न आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार राजन तेली यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकतीच तेली यांनी भाजपची साथ सोडून मशाल हाती घेतली. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब या अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत देखील बंडखोरी अटळ आहे. संपलेला पक्ष वाढवणाऱ्या व पक्षफुटीनंतर सोबत राहिलेल्या घारेंची समजूत काढण्यात पवार यशस्वी होतील का हे देखील पहावं लागेल. मात्र, सध्यस्थितीत सावंतवाडीत चौरंगी लढत होणार असल्याची दाट शक्यता आहे. युती,आघाडीत बंडखोरी अटळ असून ही बंडाळी युती, आघाडीच्या उमेदवारांच्या पथ्यावर पडणार की नुकसानीची ठरणार ? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.