
सावंतवाडी : विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून एकही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. एकुण आठ अर्ज संभाव्य उमेदवारांकडून नेण्यात आले आहेत.
आजपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून २९ ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. ३० ऑक्टोबरला अर्ज छाननी तर ४ नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवस असणार आहे. पहिल्या दिवशी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. मात्र, आठ अर्ज उमेदवार प्रतिनीधींकडून नेल्याचे समोर येत आहेत. यामध्ये दीपक केसरकर, राजन तेली यांच्याकडून प्रत्येकी एक तर अर्चना घारे-परब यांच्याकडून चार अर्ज घेतल्याची माहिती समोर येत आहे. माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांच्याकडून देखील अर्ज घेतला गेल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली.
विधानसभा मतदारसंघात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. अद्याप कोणाचीही उमेदवारी जाहीर झाली नसून संभाव्य उमेदवारांपैकी काहीजण अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.