
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा क्षेत्रामध्ये मी माझी उमेदवारी कायम ठेवली आहे. माझा लढा जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी आहे. काही लोकांनी सिंधुदुर्ग जिल्हा लुटून अक्षरशः अवैध मार्गाने खोर्याने पैसा कमावला आहे. त्याची उधळपट्टी विधानसभा निवडणूकीत नक्की होणार. मात्र, जनतेने आता फसव्या लोकांपासून सावध राहावे अशी टीका अपक्ष उमेदवार, सुनील पेडणेकर यांनी केली आहे.
ते म्हणाले, माझी अपक्ष उमेदवारी कायम असून मला 'फलंदाज' हे चिन्ह देण्यात आले आहे. तरी तमाम मतदार बांधवांनी आणि भगिनींनी मला भरघोस मतं देऊन आपल्या सेवेची एकदा संधी द्यावी, मी आपला विश्वास नक्कीच सार्थक ठरवेल, असे देखील आवाहन त्यांनी केले. तसेच सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यांमध्ये आजही पायाभूत सुविधांची गरज का आहे ? असा सवाल केला. दीपक केसरकर यांच्यावर ही त्यांनी सडकून टीका केली. तसेच माझ्यासमोर उभे असलेल्या एकाही उमेदवाराचा आमदारकी पदासाठी हवा असलेला अभ्यास झालेला नसून मी सातत्याने अभ्यास केलाय असाही दावा त्यांनी केला. काही उमेदवारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिज संपत्तीचा पुरेपूर उपयोग करून त्यातून आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे. त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसात सावंतवाडी मतदारसंघात मतदार राजांचे मत विकत घेण्यासाठी अक्षरश: पैशांचा पाऊस पाडला जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.