'चिखलमॅन'च कोरड्या मोती तलावात धुमशान !

तलावत उतरत 'सत्कार' ; सावंतवाडीकरांच फुल्ल एंटरटेन्मेंट
Edited by: विनायक गांवस
Published on: June 02, 2023 20:20 PM
views 478  views

सावंतवाडी : दहावीच्या निकालानंतर दोन जूनची सायंकाळ सावंतवाडीकरांसाठी खास ठरली. गाळ उपसा करण्यासाठी रिकामी करण्यात आलेल्या तलावात एका इसमानं उडी घेत चिखलात धुमशान घातलं. जवळपास अर्धा तास तो जीवाची मजा करत होता. परंतु, तो आणखीन पुढे गेला तर त्याच्या जीवावर बेतेल या विचारान पोलिसांसह उपस्थितांची धाकधूक वाढत होती. त्याला बाहेर काढावा तरी कसा हाच प्रश्न पडला होता. तलावाच्या चहुबाजूंनी हा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांनी तुफान गर्दी केली होती. 


सिद्धाप्पा चन्नाप्पा बिजी (३५, रा. बेळगांव, सध्या रा. सावंतवाडी) असं त्या युवकाच नाव आहे. सावंतवाडीत काम करत तो आपला चरितार्थ चालवतो. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास तो थेट कोरड्या तलावात उतरला. तलावातील चिखलात रूतल्यानं त्याला बाहेर येण्यास अडथळा निर्माण होत होता. चिखलात मस्ती करणाऱ्या त्या युवकाला बाहेर काढावा तरी कसा ? हाच प्रश्न पोलिसांसह उपस्थितांना पडला होता. अखेर तो स्वतःच्या पायावर चालत पुढे आला. चिखलान माखलेल्या अवस्थेत सुखरुपपणे बाहेर आल्यानंतर सॅल्युट ठोकत त्यांन बचावासाठी पुढे आलेल्यांना धन्यवाद दिले. तर सावंतवाडीकरांनी देखील त्याचा तळ्यातच सत्कार केला. या सगळ्या प्रकारामुळे तलावाकाठावर एकच हास्यकल्लोळ निर्माण झाला होता.


अखेर तो सुखरूप बाहेर पडल्यानं सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला. पोलिसांनी त्याला आंघोळ घालत पोलिस ठाण्यात घेऊन जात त्याच्या कुटुंबियांकडे सुपुर्द केले. वाहतूक पोलीस राजा राणे, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, सुनील प्रभू केळूसकर यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरिकांनी त्याला बाहेर काढण्यासाठी धाव घेतली. यावेळी बाहेर पडल्यानंतर त्याला विचारलं असता ''एकडे असाच आलो होतो. आतमध्ये मला बरं वाटलं. आतमध्ये पाणीच नाही'' अशी प्रतिक्रिया त्यान दिली. त्याच्या या उत्तरानंतर कपाळावर हात मारून घेण्याची वेळ उपस्थितांवर आली. परंतु, या प्रकारामुळे सावंतवाडीकरांची सायंकाळ फुल्ल एंटरटेन्मेंटमध्ये गेली.

एकंदरीतच, कोरडा मोती तलाव आणि तलावाच्या आठवणी या असंख्य आहेत.‌ या प्रकारान आणखी एका गोष्टीची त्यात भर पडली आहे.