
सावंतवाडी : ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या कामात तज्ञ अधिकारी नाही, बांधकाम विभाग काम करत आहे. झालेल्या कामावर आमचा विश्वास नाही. यात कोणी घोटाळे केलेत ते पुराव्यानिशी योग्य वेळी सांगेन असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा विरोधी नगरसेवक संजू परब यांनी दिला. तसेच कुठे कुठे बैठका झाल्या ?, बांधकाम विभागात काय केलं ? ते दाखवून देईन. लोक धुळ खात असताना प्रशासनाला काळजी नसल्याचा आरोप त्यांनी केला. सर्वसाधारण सभेनंतर परब पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, सभेला सुट्टीवर असणाऱ्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले ऑनलाईन उपस्थित होत्या. तर प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर हे साभागृहात उपस्थित होते. त्यामुळे एकाच नगराध्यक्षांनी सभागृह चालवावे अशी मागणी आम्ही केली. ॲड. निरवडेकर यांनी ऑनलाईन बंद करण्याचे आदेश दिले त्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानले. तसेच इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांना ५ वर्षांची भाडी भरावी लागणार आहेत. मी आठवण केल्यावर स्मरण पत्र प्रशासनान पाठवलं. ४ वर्ष प्रशासन झोपून होत. त्यामुळे या गाळे मालकांना हे पैसे भरण्यासाठी मुदत द्यावी अथवा हाप्ते स्वरूपात हे पैसे भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याचे परब यांनी सांगितले.
दरम्यान, ५७ कोटीच्या नळपाणी योजनेवर काम करण्यास तज्ञ अधिकारी नाही. बांधकाम विभाग यावर काम पाहत असून ५७ कोटी पाण्यात जाण्याची भिती आहे. पुर्ण प्रवाहाने पाणी पुरवठा न झाल्यास जबाबदार कोण ? त्यामुळे या कामासाठी तज्ञ नेमावा तसेच इंजिनिअर नेमावा अशी मागणी आम्ही केली आहे. झालेल्या कामावर आमचा विश्वास नाही. यात कोणी घोटाळे केले ? ते पुराव्यानिशी योग्यवेळी सांगेन. कुठे कुठे बैठका झाल्या, बांधकाम विभागात काय केलं ते दाखवून देईन. लोक धुळ खात असताना प्रशासनाला काळजी नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी नगरसेवक अजय गोंदावळे, ॲड. निता सावंत-कविटकर, ॲड. सायली दुभाषी, अर्चित पोकळे आदी उपस्थित होते.











