रेल्वे स्टेशन मास्तरांना ४२०० ची ग्रेड मिळवून देण्याचे श्रेय 'आस्मा' संघटनेला

आर. के. शर्मा यांचे प्रतिपादन
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 06, 2026 16:15 PM
views 22  views

सावंतवाडी : भारतीय रेल्वेतील स्टेशन मास्तरांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या 'ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशन' (AISMA - आस्मा) संघटनेच्या तीन दिवसीय नेतृत्व प्रशिक्षण शिबिराचे (Leadership Training Camp) उद्घाटन आज सावंतवाडी, नवसरणी येथे पार पडले. या शिबिराचे उद्घाटन कोकण रेल्वेचे प्रिन्सिपल चीफ ऑपरेटिंग मॅनेजर श्री. आर. के. शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी ७ व्या वेतन आयोगात स्टेशन मास्तरांना ४२०० रुपयांची नियुक्ती ग्रेड मिळवून देण्याचे पूर्ण श्रेय 'आस्मा' संघटनेला दिले.

संघटना आणि संघर्षाचा गौरव

उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे श्री. आर. के. शर्मा यांनी 'आस्मा'च्या गेल्या ३० वर्षांच्या वाटचालीचे कौतुक केले. ते म्हणाले की, "स्टेशन मास्तर केडरला न्याय मिळवून देण्यात संघटनेचे योगदान मोठे आहे. विशेषतः ७ व्या वेतन आयोगामध्ये नियुक्तीच्या वेळीच ४२०० ची ग्रेड मिळवून देण्यात संघटनेने मोठे यश मिळवले आहे."

आपल्या आठवणींना उजाळा देताना शर्मा पुढे म्हणाले की, "मी स्वतः भारतीय रेल्वेच्या सेवेत 'स्टेशन मास्तर' म्हणून रुजू झालो होतो आणि आज कोकण रेल्वेच्या प्रिन्सिपल सीओएम पदाची जबाबदारी पार पाडत आहे. त्यामुळे स्टेशन मास्तर आणि संघटनेच्या समस्यांची मला पूर्ण जाणीव असून, त्यांच्या सहकार्यासाठी मी सदैव पुढे असेन."

८ व्या वेतन आयोगावर चर्चा

या शिबिरात संघटनेचे माजी केंद्रीय अध्यक्ष श्री. पी. के. दास यांनी आगामी ८ व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर स्टेशन मास्तर केडरला आवश्यक असणारी ग्रेड पे आणि त्यासाठीच्या मागण्या यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच, श्री. धनंजय चंद्रात्रय यांनी नेतृत्व गुण आणि संघटनेचा जोश यावर विचार मांडले, तर श्री. सुधीर गरुड यांनी कोकण रेल्वेतील संघटनेच्या स्थापनेपासूनचा प्रवास उलगडला.

या कार्यक्रमाला संघटनेचे केंद्रीय सल्लागार धनंजय चंद्रात्रय, उपाध्यक्ष सुधीर गरुड, मुंबई विभाग सेक्रेटरी अलोक, सेंट्रल रेल्वे सेक्रेटरी विजय पाटील, कोकण रेल्वेचे असिस्टंट ट्रॅफिक मॅनेजर प्रशांत गाड, एरिया सुपरवायझर व्ही. डी. सामंत, सल्लागार विजय वानखेडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कुलशेखर, प्रिन्स सावंत, भानुदास गावकर, सुशांत खेडेकर, समिल परब, अस्मिता सावंत, तेजस कदम आणि समन्वयक दिनेश चव्हाण उपस्थित होते.

शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद

या प्रशिक्षण शिबिरासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई, नागपूर, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, भुसावळ विभागासह कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, मडगाव आणि कारवार विभागातून सुमारे ७० ते ८० स्टेशन मास्तर सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत खेडेकर व समिल परब यांनी केले.