
सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रामाणिक प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळते, असे प्रतिपादन दयानंद कुबल यांनी केले. ते आज व्ही. एन. नाबर इंग्लिश मीडियम स्कूल, मडूरे येथे आयोजित बक्षीस वितरण समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष मंगेश कामत, प्रकाश वालावलकर, रोनापालचे माजी सरपंच सुरेश गावडे, पत्रकार प्रवीण परब, पत्रकार मंगल कामत, माजी मुख्याध्यापक भिकाजी धुरी, मडूरेचे सरपंच उदय चिंदरकर तसेच मुख्याध्यापिका नीती साळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. कुबल पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक व शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. पालकांनी मुलांबरोबर सातत्याने संवाद ठेवून त्यांना प्रोत्साहन द्यावे, तर शिक्षकांनी कठोर मेहनत घेऊन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवावे. शिस्त, परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावरच विद्यार्थी उज्ज्वल यश प्राप्त करू शकतात, असे त्यांनी सांगितले.










