
सावंतवाडी : तालुक्यात एकूण ९ जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती मतदारसंघासाठी शनिवारी ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. सावंतवाडी मतदारसंघात एकूण १ लाख ४ हजार मतदार असून जिल्हा परिषदच्या ९ जागांसाठी 43 उमेदवार तर पंचायत समितीच्या 18 जागांसाठी 81 उमेदवार रिंगणात आहेत.
आज सकाळी ८.३० वाजता सावंतवाडी येथील मतदान स्टोररूम मधून मतपेट्या १४३ केंद्रांवर अठरा बसेसमधून रवाना करण्यात आल्या आहेत. सर्व मतदान केंद्रे निवडणूक विभागाने ताब्यात घेतली आहेत. सुमारे 768 मतदान अधिकारी, कर्मचारी व पोलीस होमगार्ड , पोलीस कर्मचारी असे एकूण 1268 अधिकारी मतदान केंद्रांवर तैनात ठेवण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत व्हावी यासाठी खास निवडणूक विभागाने नियोजन केले आहे.माडखोल धवडकी शाळा नंबर २ मध्ये सखी मतदान केंद्र तर माजगाव शाळा नंबर एक मध्ये आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. या दोन्ही केंद्रांना आज शुक्रवारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी महिलांनी निर्भीडपणे मतदान करावे.
एक सखी केंद्र कशाला तर यापेक्षाही अधिक सखी केंद्रे असायला हवीत या दृष्टीने महिला वर्गाने प्रोत्साहनपूर्वक मतदान करावे. शांततेत व निर्भीडपणे मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी व अपंगांसाठी खास मतदान सुविधा ठेवण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ७. ३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान सुरू करण्यात येणार आहे या कालावधीत मतदान केंद्रावर जर मशीन बिघाड झाल्यास त्यासाठी खास सहा सर्कल विभागात तीन-तीन नायब तहसीलदार आणि राखीव मशीन तैनात करण्यात आल्या आहेत अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी समीर घारे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार श्रीधर पाटील, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.
सावंतवाडी तालुक्यात एकूण 143 मतदान केंद्र असून या सर्व केंद्रांवर केंद्र अधिकारी तसेच 157 पथके.असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर एक केंद्र अधिकारी व सहाय्यक कर्मचारी तसेच पोलीस होमगार्ड अशी व्यवस्था असणार आहे. मतदारांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर बसण्याची व्यवस्था ठेवण्यात आली आहे तसेच पाणी, चहाची व्यवस्था केली जाणार आहे. सखी मतदान केंद्र व आदर्श मतदान केंद्र अशा दोन मतदान केंद्रांवर वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.










